दैनिक स्थैर्य । दि. १९ मे २०२३ । फलटण । श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर राजेसाहेब हे सहकारातील मोठे नेतृत्व असल्याचे नमूद करीत, सन १९१६ – १७ मध्ये त्यांनी येथे लक्ष्मी सेंट्रल को – ऑप. बँकेची स्थापना केली. राष्ट्रीय स्तरावर सहकार क्षेत्राचा अभ्यास त्यांनी सर्व प्रथम केला, त्यानंतर सहकार क्षेत्रातील त्यांचे कार्य पहाता ते देशातील सहकार क्षेत्राचे प्रणेते असल्याचे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय माहिती आयोग आयुक्त उदय माहुरकर यांनी केले.
श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठान, फलटण आयोजित स्मृती महोत्सव शुभारंभ प्रसंगी श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक लि., फलटणचा श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार आयुक्त माहुरकर यांना आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सन्मान पूर्वक प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी बुलढाणा अर्बन को – ऑप. क्रेडिट सोसायटी लि., बुलढाणाचे अध्यक्ष राधेश्याम चांडक तथा भाईजी होते. २१ हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, पुणे जिल्हा परिषद माजी सदस्य बबू साहेब माहुरकर, आ. दिपकराव चव्हाण, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, बाजार समिती सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघाचे चेअरमन धनंजय पवार, महानंदचे संचालक डी. के. पवार, बुलढाणा अर्बन को – ऑप. क्रेडिट सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे, श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लढ्ढा यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि फलटण व पंचक्रोशीतील नागरिक स्त्री – पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिग्गजांशी श्रीमंत राजेसाहेब यांचे मैत्रीचे संबंध
महर्षी धोंडो केशव कर्वे, सर्वपल्ली डॉ. राधाकृष्णन, सर विश्वेश्वरय्या, जदुनाथ सरकार वगैरे देशातील अनेक दिग्गजांशी श्रीमंत राजेसाहेब यांचे मैत्रीचे संबंध होते, त्यांना येथे आणून त्यांचे प्रेरणादायी विचार, आदर्श फलटण करांसमोर ठेवून समाज घडविण्याचे काम श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब यांनी केल्याचे नमूद करीत आपल्या भूमीत लाभलेला पुरस्कार आणि झालेला बहुमान श्रेष्ठ असतो, हा पुरस्कार आपल्या भूमीतील असून तो श्रीमंत राजेसाहेब यांच्या नावाने दिला जात असल्याने आपल्यासाठी तो सर्वश्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन उदय माहुरकर यांनी केले.
छ. शिवाजी महाराज यांचा समाज हिताचा वारसा पुढे नेणारे घराणे
छ. सईबाई महाराज, छ. दिपाबाई महाराज यांच्या घराण्यातील या मंडळींनी छ. शिवाजी महाराज यांचा समाज हिताचा वारसा पुढे नेला म्हणून येथे १३० वर्षापूर्वी मुधोजी हायस्कूल उभे राहिले त्यातून हे घराणे किती दूरदर्शी आहे हे स्पष्ट होत असल्याचे नमूद करीत महापुरुषांची माहिती नसेल तर त्यांच्या पासून प्रेरणा कशी घेणार असा सवाल करीत त्यासाठी आपण महापुरुषांची चरित्रे अभ्यासत असल्याचे उदय माहुरकर यांनी स्पष्ट केले.
छ. शिवाजी महाराज केवळ राजा नव्हे सम्राट
छ. शिवाजी महाराज केवळ राजा नव्हे ते सम्राट होते, सम्राट म्हणविण्याइतपत राज्याचा विस्तार होता, त्यांचे राज्य बलसाड (गुजराथ) येथून सुरु होऊन महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक, तेलंगणा, जिंजी पर्यंत सुमारे १६०० कि. मी. लांबीच्या क्षेत्रावर असल्याने तसेच प्रजावात्सल्य, उत्तम शासक असल्याने ते सम्राट होते असे सांगून मराठ्यांचा इतिहास प्रेरणादायी आणि गौरवपूर्ण आहे, त्यातून प्रेरणा घेण्याची आवश्यकता असल्याचे आयुक्त उदय माहुरकर यांनी आवर्जून सांगितले.
स्वातंत्र्यवीर सावरकर चरित्र अत्यंत प्रेरणादायी
आपण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वर पुस्तक लिहिले आहे, ते लिहिताना त्यामध्ये त्यांच्या चुकांचा उल्लेख केला आहे, मात्र एकूण चरित्र अत्यंत प्रेरणादायी असून प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक असल्याचे नमूद करीत अखंड भारताची फाळणी किंवा विभाजन ते नक्की रोखू शकले असते असा विश्वास आयुक्त उदय माहुरकर यांनी यावेळी व्यक्त केला.
राष्ट्र बचाव, संस्कृती बचाव अभियान सुरु : सहभागी व्हा
आपण दि. २५ डिसेंबर रोजी भोपाळ येथून राष्ट्र बचाव, संस्कृती बचाव अभियान सुरु केले असून त्याला विविध स्तरावरुन उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे निदर्शनास आणून देत बलात्कार, व्यभिचाराच्या घटना वाढत असताना सोशल मीडिया, सिनेमा, फोटो ग्राफी च्या माध्यमातून देश दुर्गतीकडे जात असल्याचे दिसते असे प्रतिपादन उदय माहुरकर यांनी केले.
सांस्कृतिक क्षेत्रातील पीछेहाट पाहता देश महासत्ता कसा बनणार
देश आर्थिक, सैनिक (संरक्षण), वैज्ञानिक क्षेत्रात महान बनणार का असा सवाल करीत सर्व क्षेत्रात देश महासत्ता नक्की बनेल पण सांस्कृतिक क्षेत्रात सुरु असलेली पिछेहाट पहाता देश महासत्ता कसा बनणार असा सवाल करताना अमेरिके सारखा बलाढ्य देश व्यभिचारामुळे अत्यंत वाईट स्थितीत पोहोचल्याचे नमूद करीत आपल्या देशातील व्यभिचार रोखण्याचा प्रयत्न झाला नाही तर आपली अवस्था त्यापेक्षा वाईट होणार असल्याचे सांगताना ओटीटी, सोशल मिडिया, सिनेमा वगैरे साधने आपल्या एकूणच नागरी जीवनावर हल्ला करीत असतील तर त्याचा प्रतिकार केलाच पाहिजे असे आवाहन करताना ससुर – बहु व्यभिचार, शिक्षक – विद्यार्थी व्यभिचार या सारख्या फिल्म सोशल मिडियावर येत असतील तर नेमके काय सुरु आहे असा सवाल आयुक्त उदय माहुरकर यांनी उपस्थित केला.
सरकार त्यांचे काम करेल : आपलीही काही जबाबदारी
सरकार आपले काम नक्की करेल पण या देशातील नागरिक म्हणून आपली काही जबाबदारी आहे, या घटना, गोष्टींना आपल्या परीने विरोध केला पाहिजे, त्यासाठी आपण सुरु केलेल्या राष्ट्र बचाव – संस्कृती बचाव अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करताना रामदेव बाबा, मोहन भागवत, श्री श्री रविशंकर यांच्या सह अनेकांनी या अभियानाला पाठिंबा दिला आहे. सिनेमा, पोस्टर किंवा तत्सम जे चुकीचे असेल, समाजहिता विरुद्ध असेल त्याला विरोध करण्यासाठी हे अभियान सुरु केल्याचे सांगत अशा चुकीच्या गोष्टी निदर्शनास आणून देण्यासाठी योग्य ठिकाणी तक्रार नोंदविणे आवश्यक आहे, त्यासाठी अभियानांतर्गत तयार केलेला फॉर्म भरुन पोलिस ठाण्यात दाखल करण्याचे आवाहन आयुक्त उदय माहुरकर यांनी यावेळी केले. सन २०११ मध्ये भ्रष्टाचार विरोधी आंदोलन आपण यशस्वी केले आता राष्ट्र बचाव – संस्कृती बचाव अभियान यशस्वी करण्याचे आवाहन आयुक्त उदय माहुरकर यांनी केले.
शिक्षण आणि माहितीचा अधिकार कायदा चुकांची दुरुस्ती अनिवार्य
अध्यक्षीय भाषणात बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्यामजी चांडक तथा भाईजी यांनी शिक्षण क्षेत्रातील कारभार, कामकाज पद्धती आणि माहितीचा अधिकार कायद्याचा वापर यावर सडकून टीका करताना त्यामधील चुकांची दुरुस्ती करण्याची मागणी अत्यंत प्रभावीपणे उपस्थितांसमोर ठेवली.
त्यागातून समाजसेवा घडावी, मालोजीराजे यांचे कार्य प्रेरणादायी
श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब फलटण संस्थानचे अधिपती असले तरी त्यांची कार्यपद्धती लोकसेवेची होती, त्यागातून समाज सेवाघडावी यासाठी सर्वसामान्य माणूस प्रमाण मानून संस्थानात आणि त्यानंतर स्वातंत्र्यातील मंत्रीमंडळात त्यांनी काम केले, त्यांचा तो विचार पुढे नेण्याचे काम आम्ही सुरु ठेवले आहे, यापुढेही ते अखंडित सुरु ठेवण्याची ग्वाही फलटण संस्थानचे २९ वे वंशज आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिली.
ओळखीमुळे जलक्रांती झाली, साखर कारखाने उभे राहिले, सुबत्ता आली
श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब यांची ओळख असल्यानेच तत्कालीन समाजातील मोठी व कर्तृत्ववान माणसांचे आदर्श, त्यांचे विचार फलटणकरांना प्रत्यक्ष समजावून घेता आले, तीच परंपरा स्मृती महोत्सवाच्या माध्यमातून आजही अखंडित सुरु असल्याचे नमूद करीत सर विश्वेश्वराय्या यांच्या ओळखी येथे जलक्रांती झाली, उजवा कालव्याद्वारे शेतीला सुरक्षितता लाभली, ऊसाचे मळे फुलले, साखर कारखाने उभे राहिले, सुबत्ता आ आ. श्रीमंत रामराजे यांनी निदर्शनास आणून दिले.
संस्कार हिन पिढी घडण्याचा धोका लक्षात घ्यायला हवा
इंटरनेटच्या माध्यमातून निर्माण झालेली साधने, सुविधांचा वापर चुकीच्या पद्धतीने सुरु झाला, माणूस त्याच्या अधिन झाला, आणि तोच संस्कार समजून नवी पिढी घडली तर संस्कारहिन पिढी निर्माण होण्याचा धोका ओळखून समाजाने या सर्व बाबींचा विचार करण्याची गरज आ. श्रीमंत रामराजे यांनी स्पष्ट पणे बोलून दाखविली.
आपला सहवास आणि मार्गदर्शन आमच्यासाठी उपयुक्त
आपल्या कुटुंबातील लढवय्या नेत्यांनी मराठा साम्राज्याला बळ दिले, त्यासाठी माहुर, ता. पुरंदर (सासवड), जि. पुणे येथून उत्तर प्रदेशात जाऊन मिळविलेली विजयश्री प्रेरणादायी आहे, पण त्यामुळे आपण ग्वाल्हेर आणि बडोद्यात केलेले वास्तव्य आमचे नुकसान करणारे ठरत आहे, आपण महाराष्ट्र विसरलात, तसे होऊ देवू नका किमान वर्षातून महिनाभर येथे वास्तव्य करा, तुमचे अनुभव, बुद्धिमत्ता, दूरदृष्टीचा उपयोग आम्हाला झाला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे, आपला सहवास, आपले मार्गदर्शन आम्हाला घडावे अशी अपेक्षा आ. श्रीमंत रामराजे यांनी व्यक्त केली.
समाज सुधारणेच्या कामातील भूमिका, दिलेले योगदान मार्गदर्शक
प्रारंभी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत व मान्यवरांचे सन्मान केल्यानंतर प्रास्ताविकात माहुरकर कुटुंबातील लढवय्या तरुणांनी मराठ्यांच्या इतिहासात केलेल्या प्रेरणादायी कामाचा उल्लेख करीत जिंकलेल्या लढाया, मिळविलेले विजय याविषयी विवेचन करताना ही सर्व मंडळी इथली होती याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे नमूद करीत, आजही आपण समाज सुधारणेच्या कामात घेतलेली भूमिका, दिलेले योगदान आमच्यासाठी निश्चित मार्गदर्शक असल्याचे आवर्जून सांगितले.
प्राचार्य विश्वासराव देशमुख यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करुन दिला तर प्रा. डॉ. प्रभाकर पवार यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले. प्रा. डॉ. संजय दिक्षीत, प्रा. डॉ. अशोक शिंदे, प्रा. निलम देशमुख यांनी सूत्र संचालन केले. स्वागत गीत व पसायदान सौ. स्वप्नाली शिंदे, सौ. शुभांगी बोबडे, अनिकेत देशपांडे व नितीन राऊत यांनी सादर केले.