अन्यथा आरकेसी कंपनीला परिणामांना सामोरे जावे लागेल


दैनिक स्थैर्य । दि. १९ मे २०२३ । फलटण । पुणे पंढरपूर महामार्गावर काही दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी भरधाव ट्रकने युवकांना उडवल्यामुळे आमिर शेख व गणेश लोंढे यांचा जागीच मृत्यू झालेला आहे. दोन्हीही युवकांच्या घरची परिस्थिती ही अत्यंत नाजूक असून दोन्हीही युवकांच्या कुटुंबीयांना शासनाच्या व आरकेसी कंपनीच्या माध्यमातून भरीव आर्थिक मदत झाली पाहिजे; अन्यथा आरकेसी कंपनीला आगामी काळामध्ये पुढील परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशारा संतप्त मोर्चेकर्‍यांनी दिला.
फलटण येथील उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांना फलटण शहरातील नागरिकांनी मूक मोर्चा काढत निवेदन दिले. निवेदन देताना मोर्चेकरी बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक सनी अहिवळे, फिरोज आतार, अशोकराव जाधव, युवा नेते तुषार नाईक निंबाळकर, सुधीर अहिवळे, अनिकेत अहिवळे, पप्पू शेख, अमीर शेख, अमोल सस्ते, सनी काकडे यांच्यासह विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील मठपती म्हणाले की, येणाऱ्या काळामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून व श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून लवकरात लवकर दोन्हीही कुटुंबांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत.
यावेळी बोलताना युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते अमीर शेख म्हणाले की, दोन्हीही युवकांच्या कुटुंबाची परिस्थिती ही अत्यंत नाजूक अशी आहे. आगामी काळामध्ये आरकेसी कंपनीच्या माध्यमातून जर दोन्हीही कुटुंबांना भरीव अशी आर्थिक मदत झाली नाही; तर त्यांना पुढील परिणामांना सामोरे जावे लागेल.
यावेळी बोलताना अनिकेत अहिवळे म्हणाले की, फलटण शहरांमधील दोन्हीही कुटुंबांचा उदरनिर्वाह या दोन युवकांच्या माध्यमातूनच सुरू होता. त्यामुळे शासनाच्या माध्यमातून व आरकेसी कंपनीच्या माध्यमातून लवकरात लवकर दोन्हीही कुटुंबांना आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे.
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते सनी काकडे म्हणाले की, प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे फलटणमधून रात्रीसुद्धा कंत्राटदार आहे आपली कामे करीत आहेत. त्यामुळे ज्या प्रकारे कंपनीच्या माध्यमातून दोन्ही कुटुंबांना आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे; त्याचप्रमाणे प्रशासनाने सुद्धा याची दखल घेऊन शासन स्तरावर प्रयत्न करून दोन्हीही कुटुंबांना भरीव मदत करणे गरजेचे आहे.


Back to top button
Don`t copy text!