सोमवार पेठेत श्री मुक्ताई देवीच्या पालखी यात्रेस भाविकांच्या अलोट गर्दीत सुरुवात; नगराध्यक्ष समशेरसिंह यांची प्रमुख उपस्थिती


फलटण शहरातील सोमवार पेठ येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री मुक्ताई देवीच्या पालखी यात्रेस नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.

स्थैर्य, फलटण, दि. 22 एप्रिल : फलटण शहरातील सोमवार पेठ येथील ग्रामस्थांचे व भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री मुक्ताई देवीच्या पालखी यात्रेस आज अत्यंत भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. या मंगलमय प्रसंगी देवीच्या दर्शनासाठी आणि पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

या यात्रेचा आणि पालखी प्रस्थानाचा शुभारंभ फलटण नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. त्यांनी श्री मुक्ताई देवीचे मनोभावे दर्शन घेऊन आणि विधिवत पूजा करून या पालखी सोहळ्यास सुरुवात केली.

या सोहळ्याप्रसंगी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह फलटण नगरपरिषदेच्या सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापती तथा नगरसेवक सोमाशेठ जाधव (अण्णा), आणि नियोजन व विकास समितीचे सभापती तथा नगरसेवक संदीप चोरमले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याशिवाय परिसरातील अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि प्रतिष्ठित नागरिक याठिकाणी उपस्थित होते.

‘श्री मुक्ताई देवीच्या नावानं चांगभलं’ अशा जयघोषाने आणि भक्तीमय वातावरणाने संपूर्ण सोमवार पेठ परिसर दुमदुमून गेला होता. देवीच्या पालखीच्या स्वागतासाठी मार्गावर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या आणि सडा टाकण्यात आला होता.


Back to top button
Don`t copy text!