यवतेश्वर च्या दरीत पडलेल्या व्यापाऱ्याला जीवदान; शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमचे अथक प्रयत्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०२ डिसेंबर २०२१ । सातारा । साताऱ्याच्या मार्केट यार्डमध्ये कांदा बटाटय़ाचा व्यापार करणारा व्यापारी सुशांत श्यामराव बोराटे (वय 38, रा. करंजे पेठ, सातारा) हा मंगळवारी रात्री मित्रांसमवेत यवतेश्वर परिसरात ओली पार्टी करण्यासाठी गेला होता. आज सकाळी काहीजणांना तो यवतेश्वरच्या दरीत पडल्याचे दिसून आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. सातारा तालुका पोलीस अन् शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमने अथक परिश्रम घेऊन त्याला 200 फुट खोल दरीतून जीवंत बाहेर काढले. मात्र, तो स्वतः दरीत पडला की त्याला त्याच्या मित्रांनी दरीत ढकलून दिले, याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सातारा तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की बुधवारी सकाळी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फोनवरुन यवतेश्वरच्या दरीत एकजण जखमी अवस्थेत पडल्याबाबतचा निनावी फोन आला. या फोनवरुन सातारा तालुका पोलीस घटनास्थळी पोहचले. दरीत युवक दिसत असल्याने त्यापर्यंत पोहचून त्याला बाहेर काढणे गरजेचे होते. त्यामुळे शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमला बोलवण्यात आले. रेस्क्यू टीमचे जवान त्याच्याजवळ पोहचले तर जखमी झालेला युवक वेदनेने तडफडत होता. त्याला जीवंत पाहून मदत कार्य वेगाने सुरु करुन त्याला दरीतून दुपारी बाहेर काढण्यात यश आले. त्याचा डावा पाय मोडला असून त्यास लगेच त्यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

सुशांत बोराटे याने पोलिसांना अशी माहिती दिली आहे की, आम्ही मित्र पार्टी करण्यास गेलो. पार्टी केली, जेवलो. त्यानंतर आमच्यामध्ये वाद झाला. अन् त्यातील काहींनी ढकलून दिले असे तो सांगत आहे. तर त्याची दुचाकी ही घटनास्थळापासून काही अंतरावर आढळून आली. त्यामुळे तो स्वतः दारु पिऊन पडला की त्याला त्याच्या मित्रांनी ढकलून दिले याचा शोध पोलीस घेत आहेत.


Back to top button
Don`t copy text!