दैनिक स्थैर्य | दि. ५ एप्रिल २०२४ | फलटण |
जाधववाडी, ता. फलटण येथील शिवानी अनिल फडतरे हिची सरळ सेवा परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात राज्य शासनाच्या ‘अॅग्रीकल्चर असिस्टंट’ तर केंद्र शासनाच्या ‘अॅग्रीकल्चर फिल्ड ऑफिसर वर्ग १’ या पदी निवड झाली आहे. एकाच वेळी राज्य व केंद्र शासनाच्या परिक्षेत निवड झालेली फलटण तालुक्यातील एकमेव महिला असल्याचा बहुमान शिवानीने पटकविला आहे.
फलटण तालुक्यातील जाधववाडीसारख्या ग्रामीण भागातील शिवानी फडतरे हिची घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. वडिलांचे मायेचे छत्र, आधार हरपलेल्या आईने काबाडकष्ट करून शिवानीला शिक्षण दिले. शाळेत हुशार असल्याने शिक्षण घेताना घरची जबाबदारी सांभाळत, अनेक चढउतार पाहत, आपल्या जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासावर खडतर परिश्रम घेत शिवानीने प्राथमिक शिक्षण जि. प. शाळा गिरवी, माध्यमिक शिक्षण छत्रपती शिवाजी विद्यालय गिरवी, उच्च माध्यमिक शिक्षण श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालय फलटण, ग्रॅज्युशन अॅग्रीकल्चर महाविद्यालय, पुणे येथे पूर्ण केले. त्यानंतर स्पर्धा परीक्षेचा स्वत: अभ्यास करून हे यश प्राप्त केले आहे. राज्य शासनाच्या ‘अँग्रीकल्चर असिस्टंट’ तर केंद्र शासनाच्या ‘अॅग्रीकल्चर फिल्ड ऑफिसर वर्ग १’ या पदी तिची निवड झाली आहे.
या यशाबद्दल शिवानीवर फलटण तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व मित्रमंडळी व नातेवाईकांनी शुभेच्छांचा व कौतुकाचा वर्षाव केला आहे.