‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ सोहळ्याचे लवकरच आयोजन – क्रीडा मंत्री गिरीष महाजन


दैनिक स्थैर्य । दि. १२ मे २०२३ । मुंबई । शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान सोहळा लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.

मंत्री श्री.महाजन यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांच्या अध्यक्षतेखाली शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार राज्यस्तरीय निवड समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याण प्रधान सचिव रणजित सिंह देओल, आयुक्त डॉ. सुहास दिवसे, उप सचिव सुनिल हंजे, अशासकीय सदस्य नामदेव शिरगावकर, अर्चना जोशी, कविता राऊत उपस्थित होते.

मंत्री श्री महाजन म्हणाले, राष्टकुल क्रीडा स्पर्धा, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आणि खेलो इंडिया युथ गेम स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंना शासनाकडून देण्यात येणाऱ्या बक्षिसांच्या रोख रक्कमेत दुप्पट ते चौपट वाढ करण्यात आली आहे. ही रक्कम तातडीने पदक विजेत्या खेळाडूंच्या बँक खात्यात जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यात क्रीडा संस्कृतीचा वारसा जपला जाऊन त्याचे संवर्धन व्हावे या हेतूने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्ती, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू आणि साहसी कामगिरी करणाऱ्या व्यक्ती यांचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार याच महिन्यात प्रदान करण्यात येणार असल्याचे श्री.महाजन यांनी यावेळी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!