
भारतीय बौद्ध महासभेच्या माजी पदाधिकारी व वाठार निंबाळकर शाळेच्या सेवानिवृत्त आदर्श शिक्षिका शीला काकडे यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने फलटण तालुक्यातून हळहळ व्यक्त होत असून विविध मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली.
स्थैर्य, फलटण, दि. २९ जून : भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुका शाखेच्या माजी संघटक, आदर्श शिक्षिका व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शीला सूर्यकांत काकडे यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने शैक्षणिक, सामाजिक आणि बौद्ध धम्म चळवळीची मोठी हानी झाली असून विविध स्तरांतून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे.
३६ वर्षांची प्रदीर्घ शैक्षणिक सेवा
शीला काकडे यांनी २२ सप्टेंबर १९८२ रोजी पिंपरद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून शिक्षक म्हणून सेवेला सुरुवात केली. त्यानंतर विद्यानगर (विडणी), पिंपरद (मुख्याध्यापिका), खेड (खंडाळा) आणि वाठार निंबाळकर येथे त्यांनी आपली सेवा बजावली. ३१ मे २०१९ रोजी तब्बल ३६ वर्षे ८ महिन्यांची प्रदीर्घ सेवा पूर्ण करून त्या सेवानिवृत्त झाल्या. आपल्या कार्यकौशल्य, शिस्तप्रियता आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्यामुळे त्यांनी आदर्श शिक्षिका व मुख्याध्यापिका म्हणून लौकिक मिळवला होता.
सामाजिक व धम्मकार्यात योगदान
सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आपला संपूर्ण वेळ धम्मकार्य आणि सामाजिक कार्यासाठी समर्पित केला. भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून त्यांनी महिलांचे प्रबोधन, सामाजिक परिवर्तन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले. निष्ठावान, मनमिळावू आणि संयमी व्यक्तिमत्त्व म्हणून त्या सर्वपरिचित होत्या.
मान्यवरांकडून भावपूर्ण आदरांजली
अंत्यसंस्काराप्रसंगी अनेक मान्यवरांनी शीला काकडे यांना आदरांजली वाहिली. सोमीनाथ घोरपडे यांनी त्यांच्या नावाने वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले. तर, रामचंद्र मोरे यांनी बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार विधी पार पाडला. यावेळी भीमराव लोंढे, श. ज्ञा. कांबळे आणि राजेंद्र काकडे यांनी त्यांच्या शैक्षणिक व विज्ञाननिष्ठ जीवनविचारांचा गौरव करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या पश्चात चार मुली, एक मुलगा आणि मोठा परिवार आहे.