शरद पवार पुन्हा भिजले, दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी अवकाळी पावसात आले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०८ मे २०२३ । सोलापूर । राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा सोलापूर दौरा वेगवेगळ्या अंगांनी चर्चेत आला आहे. राजीनामा नाट्यानंतर सोलापूर जिल्ह्यात झालेलं त्यांचं स्वागत, राष्ट्रवादी पक्षात युवा नेत्याचा झालेला पक्षप्रवेश, पंढरपूरच्या विठु-माऊलीचं दर्शन आणि चक्क अवकाळी पावसात भिजत आपल्या सहकाऱ्याच्या पुतण्याच्या लग्नात केलेली एंट्री. त्यामुळे, शरद पवारांची पुन्हा एकदा क्रेझ सोलापूर जिल्ह्यात दिसून आली. सध्या सोशल मीडियावर शरद पवारांचे या लग्नातील फोटो व्हायरल होत आहेत.

राज्यातील विधानसभा निवडणुकांच्यावेळी साताऱ्यातील शरद पवार यांची सभा चांगलीच गाजली होती. साताऱ्यातील पोटनिवडणुकीत विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासाठी त्यांनी सभा घेतली होती. या सभेवेळी अचानक जोराचा पाऊस सुरू झाला. मात्र, सभेला आवर न घालता, शरद पवारांनी भरपावसात सभा घेतली. या सभेचा फोटो आणि व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. विशेष म्हणजे पावसातील ही सभा उदयनराजे भोसले यांच्या पराभवालाही कारणीभूत ठरली आणि ऐतिहासिक ठरली. त्यामुळे, शरद पवार आणि पावसातील सभा हे आठवणीतील समिकरणच तयार झाले आहे. आता, पुन्हा एकदा शरद पवार पावसात भिजल्याचे पाहायला मिळाले. सोलापूर दौऱ्यावर एका सहकाऱ्याच्या पुतण्याच्या लग्नासाठी ते आले असता, पावसात उभे राहून त्यांनी वधु-वरास आशीर्वाद दिले.

सोलापूरचे राष्ट्रवादीचे माजी महापौर मनोहर पंत सपाटे यांच्या पुतण्याचा विवाह सोहळा आज पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे उपस्थित राहणार होते. मात्र अचानक लग्न सोहळ्या दरम्यान पाऊस सुरू झाला. या पावसामुळे साऱ्यांची तारांबळ उडाली. मात्र, भर पावसात शरद पवार यांचे आगमन झाले. त्यामुळे लग्न मांडवातील वातावरणही बदलून गेल्याचं दिसून आलं. दिवसभरातील व्यस्त दौरा आणि अचानक अवकाळी पावसाची झालेली हजेरी, यामुळे शरद पवार लग्नाला येतील की नाही, अशी शंका सपाटे कुटुंबीयांना होती. मात्र, शरद पवार आले, पावसात भिजले आणि वधु-वरास आशीर्वादही दिले.


Back to top button
Don`t copy text!