कुख्यात गुंड गजानन मारणेविरोधात पिंपरी चिचंवडमध्ये गुन्हा दाखल, शंभूराज देसाईंकडून मिरवणुकीच्या चौकशीचे आदेश


स्थैर्य,सातारा, दि.१६: गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी कुख्यात गुंड गजानन मारणेच्या 300 गाड्यांच्या मिरवणूक प्रकरणी चौकशी करुन कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे. ते पुणे येथे बोलत होते. पुण्यातील दोन खून प्रकरणातून मुक्तता झाल्यानंतर गजानन मारणेची तळोजा येथील कारागृहातून सुटका झाली होती. शंभूराज देसाई या प्रकरणी पुणे पोलीस आयुक्तांशी चर्चा करणार आहेत. जानन मारणे याच्यावर जेलमधून सुटून आल्यानंतर पहिला पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात गुन्हा दाखल झाला आहे.

शंभूराज देसाई काय म्हणाले?

कुख्यात गुंड मारणे टोळीचा म्होरक्या गजानन मारणेची जेलमधून सुटल्यानंतर 300 गाड्यांची भव्य जंगी मिरवणूक काढण्यात आली होती. त्याप्रकरणी गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी चौकशीअंती कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर मिरवणूक काढणे हा प्रकार पूर्णपणे चुकीचा आणि नियमाला धरून नसल्याचे देसाई म्हणाले म्हणले आहे.

जामिनावर सुटल्यानंतर एवढ्या मोठ्या संख्येने माणसं जमवणं, दोन-तीनशे गाड्या घेऊन मिरवणूक काढणे अजिबात नियमाला धरून नाही. आत्ताच थोड्यावेळापूर्वी गजानन मारणे प्रकरणाची माहिती मिळालेली आहे.

पुणे पोलीस आयुक्तांशी चर्चा करणार

शंभुराज देसाई यांनी गजाजन मारणे मिरवणूक प्रकरणी पुण्याच्या पोलीस आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं. संबंधित घटनेती मिरवणुकीच्या व्हिडीओ क्लिप तपासल्या जाणार आहेत. बेकायदेशीर पद्धतीनं जमाव जमवला असेल तर चौकशीअंती त्याच्यावर कारवाई केली जाईल, असं गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात गुन्हा दाखल

कुख्यात गुंड गजानन मारणे याच्यावर जेलमधून सुटून आल्यानंतर पहिला पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात गुन्हा दाखल झाला आहे. मारणे हा त्याच्या साथीदारासह पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावरून पुण्याच्या दिशेने येत असताना गुंड गजानन मारणे याच्या साथीदारांनी उर्से टोल नाका येथे थांबून फटाके वाजवून आरडा-ओरडा केला होता. या सर्वाचे ड्रोन कॅमराने चित्रीकरण करून दहशतीचे वातावरण निर्माण केल्या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

गजानन मारणे सोमवारी कारागृहाबाहेर

कुख्यात गुंड गजानन मारणे सोमवारी सायंकाळी तळोजा कारागृहातून बाहेर आला. त्यावेळी कारागृहाबाहेर मोठ्या संख्येने त्याचे समर्थक जमले होते. कुख्यात गुंड गजानन मारणे याच्या सुटकेनंतर त्याच्या पिलावळीने एक प्रकारे शक्ती प्रदर्शनच केले. पिंपरी – चिंचवडच्या हद्दीतून सायंकाळी पुण्याच्या दिशेने मारणे आणि त्याच्या समर्थकांचा ताफा गेला.

2014 पासून तुरुंगात

कुख्यात गुंड गजाजन मारणे याच्यावर 2014 मधील दोन खून प्रकरणात कारवाई करण्यात आली होती. पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणी मारणे व समर्थकांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी त्याला येरवडा जेलमध्ये ठेवण्यात आलं होते.


Back to top button
Don`t copy text!