स्थैर्य, सातारा, दि.९ : दि. 16 सप्टेंबर 2020 रोजी ए-1 चिकन सेंटर, मोळाचा ओढा (ता. सातारा) येथून अज्ञानांनी चोरून नेलेल्या दुचाकीचा गुन्हा उघड करण्यात शाहूपुरी पोलिसांना यश आले असून, पोलिसांनी दुचाकीसह दोघांना अटक केली आहे. दीपक प्रल्हाद जाधव (वय 36, रा. मोळाचा ओढा, सातारा. मूळ रा. मल्हारपेठ, ता. पाटण) व शरद सिन्नाना जाधव (वय 27, रा. कात्रज, पुणे. मूळ रा. फलटण) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल, पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर व गुन्हे प्रकटीकरण शाखेस दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात वाढ होत असल्याने याबाबत माहिती प्राप्त करून गुन्हे उघडकीस आण्याबाबत सूचना देऊन मार्गदर्शन केले होते.
त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेत असताना गुन्हे शाखेच्या स्टाफला गोपनीय माहिती मिळाली की, वरील गुन्ह्यातील दुचाकी ही कोंडवे परिसरात राहणार्या इसमाने चोरी केल्याची खबर मिळाली होती. त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण स्टाफने दि. 8 डिसेंबर रोजी सायंकाळी 7च्या सुमारास सदर इसमांस कोंडवे (ता. सातारा) येथे सापळा लावून ताब्यात घेऊन त्याच्याकडे दुचाकीबाबत विचारपूस केली असता प्रथम उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यानंतर त्या चोरट्याने गुन्हा केल्याची कबुली देऊन त्याने चोरून नेलेली लाल रंगाची स्पलेंडर दुचाकी ही कात्रज (पुणे) येथे चौकात काम करणार्या अनोळखी इसमास नेऊन विकल्याची कबुली दिली. त्यानंतर सदर संशयित इसमाचा शोध घेण्याकामी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी पुणे येथे गेले.
कात्रज जवळ चौकात काम करणारे इसम एकत्र होतात. त्याठिकाणी सकाळी 7 वाजल्यापासून सापाळा लावून थांबले होते. त्यानंतर 8.30च्या सुमारास सदरचा इसम चोरीच्या दुचाकीसह सदर ठिकाणी आल्यानंतर तो पोलीस कर्मचार्यांना पाहून दुचाकीसह पळून जाऊ लागला. म्हणून पोलीस कर्मचार्यांनी त्याचा पाठलाग करून त्यास कात्रज चौकात थांबवून ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीस गेलेली 7 हजारांची लाल रंगाची स्प्लेंडर दुचाकी हस्तगत करून दुचाकी चोरीचा गुन्हा उघड केला आहे. यामध्ये दीपक प्रल्हाद जाधव (वय 36, रा. मोळाचा ओढा, सातारा, मूळ रा. मल्हारपेठ, ता. पाटण) व शरद सिन्नाना जाधव (वय 27, रा. कात्रज, पुणे, मूळ रा. फलटण) या आरोपींना अटक करण्यात आली असून, या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार मोहन चव्हाण करीत आहेत.
या कारवाईत जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पतंगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, संदीप शितोळे, पो. ना. लैलेश फडतरे, अमित माने, स्वप्निल कुंभार, पो.कॉ. पंकज मोहिते, ओंकार यादव, मोहन पवार, सचिन पवार यांनी सहभाग घेतला.