

साताऱ्यात आयोजित १५ व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात शाहीर संभाजी भगत यांनी सद्यस्थितीवर भाष्य करताना ‘पर्यायी सांस्कृतिक राजकारण’ उभारण्याची आणि सर्व चळवळींनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली.
स्थैर्य, सातारा, दि. १० : “वर्ण, वर्ग, जात आणि स्त्रीदास्य अशी विषमता आपल्या समाजात आजही खोलवर रुजलेली आहे. जात हे शोषणाचे मुख्य हत्यार म्हणून काम करते. सध्याचा शासक वर्ग ‘सांस्कृतिक राजकारणा’चा वापर करत असून, यातून मोठी कोंडी निर्माण झाली आहे. ही कोंडी फोडायची असेल तर आपल्याला ‘पर्यायी सांस्कृतिक राजकारण’ करावेच लागेल,” असे परखड मत शाहीर संभाजी भगत यांनी व्यक्त केले.
सातारा येथे आयोजित १५ व्या ‘विद्रोही साहित्य संमेलना’च्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी त्यांनी राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक सद्यस्थितीवर जोरदार प्रहार केले.
‘नुसते सांस्कृतिक काम मुक्ती देणार नाही, सत्ता हवी’
शाहीर भगत म्हणाले की, नव्या प्रश्नांना जुनी उत्तरे चालणार नाहीत, आपल्याला नवीन उत्तरे शोधावीच लागतील. उत्तरे कृतीतून अधिक स्पष्ट होतात, त्यामुळे प्रत्यक्ष कृती करणे महत्त्वाचे आहे.
-
नुसते सांस्कृतिक काम करून आपल्याला मुक्ती मिळणार नाही, त्यासाठी आपल्याला राजकीय सत्ता हाती घ्यावी लागेल.
-
अलीकडे सत्ता मिळवण्याचे सर्व मार्ग बंद होताना दिसत आहेत. संसदीय प्रणाली कोसळत चालली असून, राजकीय संस्कृतीचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे.
-
दोन निवडणुकांच्या वेळी काम करण्यापेक्षा दोन निवडणुकांच्या ‘मधल्या काळात’ आपण तळागाळात काम करणे आवश्यक आहे. सांस्कृतिक कामाबरोबरच जनतेचे भौतिक प्रश्नही सोडवावे लागतील.
‘इव्हेंट नको, मूव्हमेंट उभी करा’
आपण प्रत्येकवेळी केवळ ‘इव्हेंट’ करतो, पण त्याची ‘मूव्हमेंट’ (चळवळ) होत नाही, ती झाली पाहिजे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. पर्यायी सांस्कृतिक चळवळ चालवताना आपले काही पर्यायी सण, उत्सव आणि संमेलने आयोजित करावी लागतील. तसेच तत्वज्ञान, शिक्षण व्यवस्था, भाषा व्यवहार आणि माध्यमांबाबतीत देखील आगामी काळात पर्यायी व्यवस्था निर्माण करावी लागेल, असे ते म्हणाले.
महामानवांच्या विचारांची चोरी आणि सांस्कृतिक गुन्हेगारी
“सध्या प्रतीके आणि महामानवांच्या चोरीचे प्रकार वाढले आहेत. या चोरीमुळे आपण सांस्कृतिक गुलाम होत आहोत. महामानवांना जिवंतपणी त्रास द्यायचा, प्रसंगी त्यांचा खून पाडायचा आणि नंतर त्याच महामानवांना ‘ब्राह्मण्याचे इंजेक्शन’ देऊन त्यांचे विचार मारत त्यांना आपलेसे करायचे, ही अलीकडच्या सांस्कृतिक गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांची पद्धत आहे. हे काम ते पिढ्यानपिढ्या करत आले आहेत.”
– शाहीर संभाजी भगत (अध्यक्ष, १५ वे विद्रोही साहित्य संमेलन)
या सर्व अतिक्रमणांना हटवण्यासाठी पर्यायी सांस्कृतिक राजकारण आवश्यक असल्याचा पुनरुच्चार करत, श्री. भगत यांनी त्यासाठी सर्व पुरोगामी चळवळी आणि संघटनांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.
कॉ. पानसरेंच्या ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाला मोठी मागणी
संमेलनस्थळावर उभारण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनातील स्टॉल्सवर कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाला वाचकांची मोठी मागणी असल्याचे दिसून आले. प्रत्येक स्टॉलवर वाचक विविध विद्रोही पुस्तकांची हाताळणी आणि खरेदी करत होते. मात्र, इतर पुस्तके खरेदी करणाऱ्या जवळजवळ प्रत्येक वाचकाच्या हातात कॉ. पानसरे यांचे हे पुस्तक आवर्जून दिसत होते, हे या संमेलनाचे एक प्रमुख वैशिष्ट्य ठरले.
