फलटण शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा


दैनिक स्थैर्य | दि. 29 मे 2024 | फलटण | गेल्या काही दिवसांपासून फलटण शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. नागरिकांना भटकी कुत्री भर दिवसा पाठलाग करत त्रास देत असल्याच्या अनेक घटना शहराच्या विविध भागांमध्ये घडताना दिसत आहेत. यावर फलटण नगर परिषदेने तातडीने उपाययोजना करून भटक्या कुत्र्यांचा योग्य तो बंदोबस्त करणे आवश्यक असल्याचे मत फलटण शहरातील नागरिक व्यक्त करताना दिसून येत आहे.

भटक्या कुत्र्यांच्या मुळे फलटण शहरांमध्ये सकाळी व संध्याकाळी जेष्ठ नागरिक व अबालवृद्ध फिरण्यासाठी बाहेर पडतात त्यांच्या मागे पाठलाग करत भटकी कुत्री लागत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेकदा पडून जखमा झाल्या असल्याच्या घटना सुद्धा फलटण मध्ये झाल्या आहेत. यासोबतच काही मोकाट कुत्री दुचाकी व चार चाकी वाहनांच्या मागे लागून दुचाकीस्वारांचा अपघात झाल्याच्या घटना सुद्धा ताज्या आहेत; यामुळे अनेकांना छोट्या-मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागले आहे.

गतकाही महिन्यांपूर्वी फलटण नगर परिषदेच्या माध्यमातून तत्कालीन मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी विविध योजना आखल्या होत्या. यामध्ये मोकाट फिरत असलेली डुकरे व गाईंचा बंदोबस्त त्यांनी केलेला होता. संजय गायकवाड यांची बदली झाल्यानंतर पुन्हा एकदा मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे दिसून येत आहे.

मोकाट जनावरांच्या व भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाचा नागरिकांना नाहक त्रास होत आहे. रात्रीच्या वेळी शहरातील चौका चौकात भटक्या कुत्र्यांचा जमाव जमलेला असतो. दुचाकी स्वारांचा पाठलाग करून हल्ले करत आहेत तर मोकाट जनावर व सांडाच्या झुंजीमुळेही अनेकदा नागरिक गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर फलटण पालिकेने याची गांभीर्याने दखल घेऊन मोकाट जनावरांचा व कुत्र्यांचा वेळीच बंदोबस्त करावा.

– युवराज शिंदे,

उपाध्यक्ष, मनसे सातारा.


Back to top button
Don`t copy text!