
दैनिक स्थैर्य | दि. १७ ऑगस्ट २०२६ | सातारा |
केंद्रीय गृहमंत्रालयाने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सातारा जिल्ह्यातील २६ पोलिस अधिकारी, कर्मचारी यांना अतिउत्कृष्ट व उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल सेवा पदक जाहीर केले. यामध्ये एलसीबीचे पो. नि. विश्वजित घोडके, कराड शहरचे पो. नि. दत्तात्रय दराडे, पो. नि. राजेंद्र शिंदे यांचा सन्मान होणार आहे.
जिल्हा पोलिस दलातील सेवा पदक जाहीर झालेल्यांमध्ये वाठारचे स.पो.नि. सुशील भोसले, स.पो.नि. सुदर्शन काटकर, फौजदार सुशील कदम, रौफ इनामदार, सहा. फौजदारांमध्ये सावता राऊत, तानाजी माने, सतीश सुभे, राजू मुलाणी, अविनाश डेरे, तेजपाल शिंदे या पोलिस अधिकार्यांचा समावेश आहे. याशिवाय पोलिस कर्मचार्यांमध्ये श्रीनिवास देशमुख, मंजरुह मणेर, मधुकर कुंभार, रोहित तोरसकर, संदीप दौंड, अमित माने, नीलेश दयाळ, मंगल कांबळे, गणेश कापरे, प्रवीण पोळ, मधुकर भिसे, मोहन नाचण व राजकुमार ननावरे यांचा समावेश आहे.
एलसीबीचे पो.नि. विश्वजित घोडके हे २००९ सालच्या बॅचचे फौजदार आहेत. सातारा जिल्ह्यासह नांदेड, लातूर, सीआयडी पुणे, सोलापूर ग्रामीण येथे त्यांनी सेवा बजावली आहे. पंढरपूर व पुसेगाव येथे बजावलेले कर्तव्य प्रभावी राहिले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा सन्मान केला आहे.
कराड शहरचे पो.नि. दत्तात्रय दराडे यांची कारकिर्द गाजलेली आहे. ३२ वॉन्टेड गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. २० खुनांच्या गुन्ह्यांची उकल त्यांनी केली आहे. १० दरोडे, २२ जबरी चोरी, १६ घरफोड्या उघड केल्या आहेत. १० पिस्टल जप्त करून १७ जणांना एमपीडीए लावला आहे. याशिवाय ३ टोळ्यांचे ‘मोक्का’ प्रस्ताव तयार केले असून त्यांना मान्यता मिळाली आहे.
पो. नि. दराडे यांना २४८ रिवॉर्ड व २०१ कॅश रिवॉर्ड मिळालेली आहेत. पोलिस महासंचालक पदकानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
