प्रवचने – गोंदवल्याच्या रामाचे वैशिष्ट्य !

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


प्रत्येकाने गोंदवल्याच्या रामाचे एकदा तरी दर्शन घ्यावे असे मला फार वाटते. ह्या रामाचे वैशिष्ट्य असे आहे की, त्याच्यापुढे उभे राहिले म्हणजे आपल्या अवगुणांची तो जाणीव करून देतो. हेच काम विशेष महत्वाचे आहे; कारण दोषांची जाणीव झाली तरच मनुष्य त्यातून सुटण्याच्या प्रयत्नाला लागेल. आपल्याला एखादा रोग झाला आहे असे समजले तरच मनुष्य त्यातून मोकळा होण्याच्या प्रयत्नाला लागेल; तसे, दोषांची जाणीव झाली तरच मनुष्य त्यातून सुटण्यासाठी रामाची प्रार्थना करून शरण जाईल. शरणागतावर कृपा करणे हे रामाचे ब्रीदच असल्यामुळे तो त्याला त्यातून सोडवीलच, आणि त्याचे काम होऊन जाईल. चांगला वैद्य कोण ? तर जो रोग्याला भूक उत्पन्न होईल असे औषध देऊन नंतर त्याला भरपूर खायला देतो, आणि ते पचेल असे औषध देऊन त्याला निरोगी आणि सशक्त बनवितो, तो. तसाच माझा राम आहे. म्हणून प्रत्येकाने त्याला एकवार तरी पहावे असे मला मनापासून वाटते.

मंदिरामध्ये मुक्तद्वार असावे, पण ते कुणाला ? तर फक्त भगवंताच्या उपासकाला ! भगवंताच्या उत्सवाला थोडेच लोक जरी जमले, पण ते नामात राहणारे असले, तर तो खरा आनंद आहे. उगीच पुष्कळ लोक जमावेत हा हेतू नसावा. मंदिर हे भगवंताच्या उपासनेचे मुख्य स्थान आहे; म्हणून ते अगदी साधे असावे, आणि तिथे उत्तम उपासना चालावी. मंदिर नेहमी भिक्षेवरच चालावे. मंदिरातून व्रताची आणि ब्रीदाची माणसे उत्पन्न झाली पाहिजेत. भगवंताला उपासना प्रिय आहे. म्हणून सोन्याची मंदिरे बांधण्यापेक्षा दगडमातीच्या मंदिरामध्येच उपासना वाढविण्याचा प्रयत्न करावा.

भगवंताच्या इच्छेनेच सर्व चालले आहे ही भावना ठेवून, जे येईल त्याला नको म्हणू नये, आणि जे येत नाही त्याबद्दल दुःख करू नये. आपल्याला भगवंताचा विसर पडला आहे. त्याचे स्मरण होण्यासाठी आणि ते सतत टिकविण्यासाठी भगवंताचे उत्सव करणे जरूर आहे. एखाद्या माणसाला पुष्कळ नाती असून तो जसा वेगळा राहू शकतो, त्याप्रमाणे भगवंत सगळ्या ठिकाणी सत्तारूपाने राहूनही आपल्या हृदयात राहू शकतो. तो सूर्याच्या प्रकाशासारखा एके ठिकाणी राहून सर्व ठिकाणी सत्तारूपाने राहातो. ज्याची भावना खरी शुद्ध म्हणजे निःसंशय असते, त्याला दगडाची मूर्तीदेखील देव बनते; भावना मात्र शंभर नंबरी पाहिजे, तीमध्ये भेसळ उपयोगाची नाही. आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेर वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करील, त्याला परमार्थाचा अनुभव लवकर येईल. नामाचा अनुभव जसा घ्यायचा असतो, तसा भगवंताचा अनुभव अनुसंधानात येतो.

उपासक देहाला विसरला की उपास्यमूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवाला येऊ लागेल.


Back to top button
Don`t copy text!