दैनिक स्थैर्य | दि. १४ सप्टेंबर २०२४ | फलटण |
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना डिग्री शिक्षणाबरोबरच रोजगारक्षम कौशल्य आधारित कोर्सेस दिल्यास स्वयंरोजगारास चालना मिळेल, असे प्रतिपादन फलटण एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या सदस्या सौ. वसुंधरा नाईक निंबाळकर यांनी केले.
मुधोजी महाविद्यालयाच्या कौशल्य विकास केंद्रांतर्गत चालविल्या जाणार्या ‘ज्वेलरी मेकिंग’ कोर्सच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रारंभी समन्वयक डॉ. योगिता मठपती यांनी प्रास्ताविक केल्यानंतर उद्घाटक म्हणून बोलताना त्या पुढे म्हणाल्या की, महाविद्यालयात अनेक उपक्रम चालवले जातात, त्यामध्ये अशाप्रकारचे कौशल्यावर आधारित व अनुभवाआधारित कोर्सेस विद्यार्थिनींसाठी उपयुक्त ठरतील व त्यातून विद्यार्थिनींना स्वयंरोजगार प्राप्त होईल. त्यामुळे असे रोजगारक्षम कोर्सेस कॉलेजमध्ये घेतले आहेत, याबद्दल त्यांनी प्रशंसा केली.
या कोर्सच्या ट्रेनर काशिद मॅडम यांनी कौशल्यासाठी ट्रेनिंगचे महत्त्व उपस्थितांना सांगितले. विशेषतः स्त्रियांना व मुलींना विशेष कार्यक्रमाप्रसंगी अशा ज्वेलरीयुक्त दागदागिन्यांची मोठ्या प्रमाणात मागणी असते, त्यामुळे या व्यवसायाला खूप मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला उपस्थित असणार्या सौ. नूतन शिंदे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य फलटण एज्युकेशन सोसायटी यांनी याप्रसंगी शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. पी.एच कदम यांनी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कौशल्य आधारित शिक्षणावर अधिक भर असून त्याअनुषंगाने असे विविध कोर्सेस महाविद्यालयांमध्ये राबविले जाणार आहेत, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याकडे काही ना काही कौशल्य प्राप्त होईल व त्यामाध्यमातून त्यांना नोकरीऐवजी स्वयंरोजगारासाठी प्रेरणा मिळेल व त्यांची बेरोजगारीतून मुक्तता होईल व युवक-युवतींमध्ये कौशल्याच्या आधारित आत्मविश्वास निर्माण होऊन स्वयंरोजगारासाठी त्यांची मानसिकता तयार होईल.
प्रारंभी कार्यक्रमाच्या उद्घाटक व विशेष उपस्थित असणार्या मान्यवरांचे प्राचार्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले, तर समारोपानंतर प्राध्यापिका सूर्यवंशी यांनी आभार मानले.
या उद्घाटन सोहळ्यास पत्रकार कदम, मानव्यविद्या शाखेचे इन्चार्ज डॉ. ए. एन. शिंदे, ऋतिका काळेल (ट्रेनर) व प्राध्यापिका आणि बहुसंख्य विद्यार्थिनी उपस्थित होत्या.