दैनिक स्थैर्य | दि. २६ ऑगस्ट २०२३ | फलटण |
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत कृषी सेवा परीक्षा घेतल्या जातात. सन २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्यातून ३२ वी रँक मिळवत सासकल, ता. फलटण गावचे सुपुत्र विकास चंद्रकांत मुळीक यांनी यश संपादन केले आहे. त्याची तालुका कृषी अधिकारी म्हणून निवड झाली आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत वडिलांचे छत्र हरपल्यानंतरही कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर विकास चंद्रकांत मुळीक याने हे यश संपादन केले आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सासकल येथून तर माध्यमिक शिक्षण शिवशंकर माध्यमिक विद्यालय सासकल येथे झाले आहे. इयत्ता अकरावी व इयत्ता बारावीचे शिक्षण त्याने मालोजीराजे कृषी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे कृषी शाखेतून पूर्ण केले आहे. त्याने कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चर, पुणे या शासकीय महाविद्यालयातून बीएससी(अॅग्री)चे शिक्षण पूर्ण केले आहे.
तालुका कृषी अधिकारी या वर्ग दोन पदी निवड झाल्यानंतर त्याने तरुणांसाठी बोलताना सांगितले की, सध्या सर्व ठिकाणी स्पर्धा सुरू आहे. तेव्हा या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटी असल्याशिवाय आपण यश संपादन करू शकत नाही. अशावेळी रोजगाराच्या संधी मिळवण्यासाठी गावच्या बाहेर गेल्याशिवाय गुणवत्तापूर्ण व व्यवसायाभिमुख शिक्षण आपल्याला मिळणार नाही. तेव्हा आपण उच्चशिक्षणावर भर द्यावा. त्याच्या या निवडीने सासकल गावातील ग्रामस्थांसह, तालुक्यातील व त्याच्या कुटुंबातील सर्वांनी त्याचे अभिनंदन केले आहे व त्याच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.