
दैनिक स्थैर्य । दि. २४ नोव्हेंबर २०२२ । फलटण । गुणवरे (ता. फलटण) गावचे सुपुत्र पवनकुमार जिजाबा गावडे यांची राज्यकर निरीक्षकपदी (एसटीआय) निवड झाली आहे. या निवडीच्या पार्श्वभूमीवर त्यांचेवर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
२०२१ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या स्पर्धापरीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये खुल्या प्रवर्गातून राज्यकर निरीक्षक पदाच्या ६०९ जागा होत्या, यामध्ये ९७ व्या क्रमांकाने पवनकुमार गावडे उत्तीर्ण झाले आहेत.
पवनकुमार यांचे चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण फलटण येथील मुधोजी बालमंदिर, पाचवी ते दहावी पर्यंतचे मुधोजी हायस्कुलमध्ये, अकरावी व बारावी पुणे येथील मॉडर्न कॉलेज पुणे, सिंहगड (पुणे) येथे मॅकेनिकल इंजिनिअरींग शाखेत पदवी प्राप्त केल्यानंतर स्पर्धापरीक्षांचा सराव पुण्यातच राहून सुरु केला होता. २०२१ मध्ये राज्य लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या राज्यकर निरीक्षक पदाच्या परीक्षेला ते बसले होते. या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात ते उत्तीर्ण झाले असून त्यांची राज्यकर निरीक्षकपदी निवड झाली आहे.
पवनकुमार यांचे वडील जिजाबा पांडुरंग गावडे हे सध्या इंदापूर तालुक्यात सहाय्यक निबंधक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांची आई सौ. शशिकला जिजाबा गावडे या गुणवरे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच व विद्यमान सदस्य आहेत.
पवनकुमार गावडे यांच्या निवडीबद्दल संपूर्ण गुणवरे गावात कौतुक केले जात असून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवाजीराव गावडे, सरपंच सौ. अधिका गावडे, उत्तमराव गावडे, गुणवरे विविध कार्यकारी सह. सोसायटीच्या चेअरमन सौ. ज्योती शिवाजीराव गावडे, संचालक हरिश्चंद्र ज्योतीराम नाळे, सचिव संदीप कदम, ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव, गुणवरे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष शिवलाल गावडे, श्रीराम कारखान्याचे संचालक विठ्ठलराव गौंड, पोलीस पाटील अमोल आढाव, ग्रामसेवक शिवाजीराव भोसले, माजी सरपंच शिवाजीराव गावडे, प्रगतशील बागायतदार कांतीलाल गौंड, युवराज सांगळे सर, पोपट भोसले (फौजी), ग्रा. सदस्य बापूराव कणसे, सुभाष कर्णे यांच्यासह पंचक्रोशीतील विविध संस्थांचे पदाधिकारी व कर्मचारी आदींनी त्यांचे अभिनंदन केले.