भडकमकर नगर व काळूबाईनगरचा पाणीप्रश्न सुटणार; नवीन पाईपलाईनला पालिकेची मंजुरी

फलटण नगरपरिषदेच्या विशेष सभेत आनंदनगर ते भडकमकर नगर नवीन पाईपलाईन आणि काळूबाईनगरच्या पाणीप्रश्नाला एकमताने मंजुरी देण्यात आली आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ०३ जुलै : फलटण शहरातील भडकमकर नगर, पद्मावती नगर आणि काळूबाईनगर परिसरातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आनंदनगर ते भडकमकर नगर अशी २५० एमएम रायझिंग मेन पाईपलाईन टाकण्यास नगरपरिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना योग्य दाबाने पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून काळूबाईनगरचा प्रश्नही मार्गी लागणार आहे.

पाण्याच्या कमी दाबाची अडचण

शहरात खजिना हौद येथील उंच टाकीवरून विविध भागात पाणीपुरवठा केला जातो. भडकमकर नगर, पद्मावती नगर आणि हनुमान नगर हा भाग खजिना हौद टाकीपासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे. लांबच्या अंतरामुळे या भागात योग्य दाबाने पाणीपुरवठा होत नाही. भडकमकर नगरमध्ये पाणीपुरवठा टप्पा पाच अंतर्गत नवीन टाकी बांधण्यात आली आहे, मात्र खजिना हौद येथून ती भरण्यास विलंब होत असल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढत होत्या.

७० एचपी मोटारीने भरणार टाकी

या समस्येवर उपाय म्हणून पेठ आनंदनगर येथील उंच टाकीवरून भडकमकर नगर टाकी भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आनंदनगर टाकीवर ७० एचपी क्षमतेची मोटार असून, तेथून भडकमकर नगरपर्यंत २५० एमएम रायझिंग मेन पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. यामुळे टाकी वेळेत भरून परिसरातील नागरिकांना मुबलक व योग्य दाबाने पाणीपुरवठा होईल.

काळूबाईनगरचा प्रश्नही मार्गी लागणार

नगरपरिषदेच्या विशेष सभेत या विषयाला एकमताने मंजुरी देण्यात आली. सभेत चर्चा सुरू असताना नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांनी काळूबाईनगर येथील पाण्याच्या टाकीचा प्रलंबित प्रश्न उपस्थित केला. या कामाचाही याच ठरावात समावेश करण्याची मागणी त्यांनी केली. यावर नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत काळूबाईनगर येथील पाण्याच्या टाकीचा प्रश्नही याच ठरावातून तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

Back to top button
Don`t copy text!