स्थैर्य, खंडाळा, दि.१९: महाराष्ट्र शासनाच्या राज्य माथाडी
सल्लागार समितीवर सातारा जिल्हा राष्ट्रवादीच्या औद्योगिक सेलचे अध्यक्ष व
उद्योजक दत्तात्रय उर्फ बंडू ढमाळ ( रा. असवली ता. खंडाळा) यांची राज्य
शासनाने नुकतीच निवड केली आहे.
बंडू ढमाळ हे गेली अनेक वर्ष शिरवळ व खंडाळा एमआयडीसीमध्ये कामगारांच्या व
व्यापारी यांच्यासंबंधी कार्यरत आहेत. विधानपरिषदेचे सभापती रामराजे
नाईक-निंबाळकर व आमदार मकरंद पाटील यांनी त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस
औद्योगिक जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सोपवली असून ढमाळ यांनी भूमिपुत्राच्या
हाताला काम मिळावे व खंडाळा तालुक्यातील औद्योगिकरण सुरळीत चालावे, यासाठी
विशेष प्रयत्न केले.
या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना माथाडी समितीवरील मालक
प्रतिनिधी म्हणून राज्यस्तरावर काम करण्याची संधी निर्माण करुन दिली.
यामुळे इंडस्ट्री व व्यापारांचे प्रश्न आग्रक्रमाने मांडणे व सोडवणे ही
प्रमुख जबाबदारी या समितीची असणार आहे. ढमाळ यांच्या नियुक्तीमुळे सातारा
जिल्ह्यातील औद्योगिकरणाचे प्रश्न शासन दरबारी सोडवणे अधिक सोयीस्कर ठरणार
आहे. या नियुक्तीबद्दल सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व आमदार पाटील, जिल्हा
परिषद अध्यक्ष उदय कबुले, सभापती राजेंद्र तांबे, जिल्हा परिषद सदस्य मनोज
पवार आदींसह नागरिक व कामगार यांनी अभिनंदन केले.