दैनिक स्थैर्य । दि. २२ मे २०२३ । मुंबई । “स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी असलेल्या भगूर येथे त्यांचे भव्य स्मारक व्हावे. तसेच ‘ने मजसी ने’ व ‘जयोस्तुते’ या सावरकरांच्या काव्यरचना शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट कराव्यात”, अशा सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केल्या.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे देण्यात येणारे 2023 वर्षाचे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार’ राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते रविवारी (दि. 21) स्मारकाच्या दादर येथील सभागृहात प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांना यावेळी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार’ मरणोत्तर प्रदान करण्यात आला. मेजर राणे यांच्या आई वीरमाता ज्योती राणे यांनी हा पुरस्कार राज्यपालांकडून स्वीकारला.
राज्यपालांच्या हस्ते आयआयटी कानपूरचे संचालक डॉ. अभय करंदीकर यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्कार’ देण्यात आला, तर नागपूर येथील ‘मैत्री परिवार’ या संस्थेला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर समाजसेवा पुरस्कार’ देण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर विचारांच्या प्रचार व प्रसार कार्यासाठी प्रदीप परुळेकर यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती चिन्ह’ पुरस्कार देण्यात आला.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांनी प्रास्ताविक केले तर स्मारकाचे अध्यक्ष व निवृत्त पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी आभार मानले. ज्योती राणे यांनी यावेळी कृतज्ञता सोहळ्याला उत्तर दिले. स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर, विश्वस्त मंजिरी मराठे व स्वप्निल सावरकर आदी उपस्थित होते.