सातारा जि.प. सभापती निवड: प्रशासनाचा कडक पावित्रा; १०० मीटर परिसरात कलम १६३ लागू

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

सातारा जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी ४ एप्रिल रोजी होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा परिषद इमारतीच्या १०० मीटर परिसरात प्रशासनाने कलम १६३ अन्वये कडक प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

स्थैर्य, सातारा, दि. २ एप्रिल : सातारा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण, महिला व बालकल्याण आणि इतर दोन विषय समित्यांच्या सभापती पदासाठी शनिवारी, ४ एप्रिल २०२६ रोजी दुसरी विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. मागील सभेतील गोंधळाची पार्श्वभूमी लक्षात घेता, यावेळी प्रशासनाने अत्यंत कडक पावित्रा घेतला आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जिल्हा परिषद इमारतीच्या १०० मीटर परिसरात ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३’ चे कलम १६३ (पूर्वीचे कलम १४४) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

शनिवारी सकाळी ७ वाजेपासून निर्बंध लागू

सभापती निवडीच्या या प्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी हे आदेश शनिवारी सकाळी ७ वाजल्यापासून ते सभेचे कामकाज संपेपर्यंत लागू राहतील. या काळात जिल्हा परिषद परिसराला अक्षरशः छावणीचे स्वरूप येणार असून, कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

कोणाला प्रवेश, कोणाला मनाई?

जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या या आदेशांनुसार, १०० मीटरच्या प्रतिबंधित क्षेत्रात केवळ खालील व्यक्तींनाच प्रवेश दिला जाईल:

  • नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य

  • संबंधित शासकीय अधिकारी आणि कर्मचारी

  • बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी

या व्यतिरिक्त इतर कोणत्याही बाहेरील व्यक्तीला किंवा कार्यकर्त्यांना या परिसरात प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

कायदेशीर कारवाईचा इशारा

शांततेत आणि पारदर्शकपणे निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे. या प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करून परिसरात गोंधळ घालण्याचा किंवा विनाकारण प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास, संबंधितांवर तत्काळ आणि कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!