

सातारा जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता पाहता जिल्हा प्रशासनाने दामिनी व सचेत ॲप डाऊनलोड करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे अर्धा तास आधीच पूर्वसूचना मिळेल.
स्थैर्य, सातारा, दि. 24 मे : सातारा जिल्ह्यात आगामी काही दिवसांत विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर तुमच्या भागात पाऊस, वीज अथवा वादळ येणार असेल तर त्याची अर्धा तास आधीच अचूक माहिती मिळण्यासाठी शासनाचे ‘सचेत’ (CAP SACHET) आणि ‘दामिनी’ (Damini) ॲप डाऊनलोड करण्याचे आवाहन सातारा जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष संतोष पाटील यांनी केले आहे.
ॲप्सद्वारे मिळणार अचूक पूर्वसूचना
या अधिकृत ॲप्सद्वारे नागरिकांना त्यांच्या परिसरातील हवामानाचे लाईव्ह अपडेट्स आणि शासकीय सूचना घरबसल्या मिळतात. मुसळधार पाऊस, वादळ आणि वीज कोसळण्याची पूर्वसूचना ३० ते ४० मिनिटे अगोदर अलर्टच्या माध्यमातून दिली जाते. जीपीएस (GPS) आधारित प्रणालीमुळे परिसराची अचूक माहिती मिळून जीवित व मालमत्तेचे मोठे नुकसान टाळता येऊ शकते. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून नागरिकांनी ही दोन्ही ॲप्स तात्काळ डाऊनलोड करावीत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सुरक्षेसाठी खबरदारीच्या सूचना
खराब हवामानाच्या काळात नागरिकांनी विशेष खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. विजांचा कडकडाट होत असताना कोणत्याही परिस्थितीत झाडाखाली किंवा इलेक्ट्रिक पोलजवळ आश्रय घेऊ नये. जनावरांनाही उघड्यावर किंवा झाडाखाली बांधू नये. नागरिक पाण्यात असल्यास त्यांनी तातडीने पाण्याच्या बाहेर पडावे.
मोबाईल आणि उपकरणांचा वापर टाळावा
वादळी वारे वाहत असताना घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करून त्यांचे प्लग बाहेर काढून ठेवावेत. अशा परिस्थितीत मोबाईलचा वापर शक्यतो टाळावा. सुरक्षेचा उपाय म्हणून नागरिकांनी या काळात सुरक्षित ठिकाणी म्हणजेच घरातच थांबावे, अशा स्पष्ट सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.