डीजे आणि डॉल्बीवर सरसकट बंदी नाही; साताऱ्याचे एसपी निखिल पिंगळे यांचे मोठे विधान

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

डीजे व डॉल्बीवर कायद्याने सरसकट बंदी आणणे शक्य नसून केवळ आवाजाची विहित मर्यादा पाळणे बंधनकारक असल्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी स्पष्ट केले.

स्थैर्य, सातारा, दि. ०७ सप्टेंबर : राज्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे आणि डॉल्बी सिस्टीमवर बंदी घालण्याची मागणी होत असताना सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी महत्त्वाची भूमिका मांडली आहे. कायद्यानुसार आणि तांत्रिकदृष्ट्या डीजे किंवा डॉल्बी सिस्टीमवर सरसकट बंदी आणता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. डॉल्बी हे एक तंत्रज्ञान असून डिस्को जॉकी (डीजे) ही एक व्यक्ती असल्याने बंदीऐवजी ध्वनीच्या मर्यादेचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

सुप्रिम कोर्टाचे निर्देश आणि नियमांचे पालन

सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार डीजे सिस्टीमवर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली नाही. परंतु ठराविक डेसिबलपेक्षा जास्त आवाज वाढवून प्रदूषण करण्यास मनाई करण्यात आली आहे. ध्वनी प्रदूषणाचे नियम मोडणाऱ्यांवर आणि कायदेशीर आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

नवीन तंत्रज्ञान आणि पोलिसांचा कडक इशारा

प्लाझ्मा किंवा मिड प्रेशर बेस सिस्टीमसारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून दोन स्पीकरच्या माध्यमातून दहा स्पीकर इतका दणदणाट निर्माण करणाऱ्यांवरही पोलीस लक्ष ठेवून आहेत. मर्यादेपेक्षा जास्त आवाज निर्माण करणारे ऑगमेंटेड साहित्य आढळल्यास ते तत्काळ जप्त केले जाईल. सण-उत्सवाच्या काळात नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला धोका निर्माण होणार नाही अशा पद्धतीनेच ध्वनीक्षेपकाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!