सातारा-सांगली विधानपरिषद निवडणूक: भाजपकडून धैर्यशील कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब; उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर


आगामी महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने (भाजप) आपल्या उमेदवारांची पहिली अधिकृत यादी आज जाहीर केली आहे. यामध्ये सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपकडून माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ३१ मे : भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्र विधानपरिषद द्विवार्षिक निवडणूक २०२६ साठी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील उमेदवारांची अधिकृत यादी आज (३१ मे) नवी दिल्ली येथून जाहीर केली. या यादीमध्ये संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा-सांगली विधानपरिषद मतदारसंघासाठी धैर्यशील कदम यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

उमेदवारीची चुरस आणि धैर्यशील कदम यांना संधी

सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी रस्सीखेच सुरू होती. साताऱ्यातून शेखर गोरे, धैर्यशील कदम आणि सुनील काटकर यांच्यासह सांगलीतूनही काही नावांची चर्चा होती. मात्र, पक्षाने संघटनात्मक ताकद आणि स्थानिक जनसंपर्क लक्षात घेऊन धैर्यशील कदम यांना विधानपरिषदेच्या आखाड्यात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीकडे या मतदारसंघात तब्बल ६३० मतांचे भक्कम संख्याबळ असल्याने भाजपच्या या उमेदवारीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

राज्यातील इतर प्रमुख उमेदवार

भाजपचे राष्ट्रीय महासचिव आणि मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या या पत्रकात एकूण १० मतदारसंघांतील उमेदवार आणि एका जागेसाठीची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

यादीतील उमेदवार खालीलप्रमाणे:

  • सांगली-सातारा: धैर्यशील कदम
  • सोलापूर: राजेंद्र राऊत
  • अहिल्यानगर: प्राजक्त तनपुरे
  • वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली: अरुण लखाणी
  • भंडारा-गोंदिया: अविनाश ब्राह्मणकर
  • अमरावती: प्रवीण पोटे पाटील
  • छत्रपती संभाजीनगर-जालना: सुहास शिरसाट
  • नांदेड: अमर राजूरकर
  • धाराशिव-लातूर-बीड: बसवराज पाटील
  • जळगाव: नंदकिशोर महाजन
  • नागपूर (पोटनिवडणूक): डॉ. राजीव पोतदार

सातारा-सांगलीच्या जागेवर धैर्यशील कदम यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सर्व राजकीय चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून, महायुती आणि भाजपच्या गोटात प्रचाराची तयारी वेगाने सुरू झाली आहे.


Back to top button
Don`t copy text!