सातारा जिल्ह्यात भात पीक नुकसान भरपाईतून वगळल्याने शेतकरी नाराज; सर्व पिकांचे पंचनामे करण्याची मागणी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

पावसाच्या ओढीमुळे भात पिकाचे मोठे नुकसान होऊनही सरकारी भरपाईच्या यादीतून भात पीक वगळल्याने पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

स्थैर्य, सातारा, दि. ०८ ऑक्टोबर : पाटण तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने मोठी उघडीप दिल्याने खरीप हंगामातील भात पिकावर गंभीर संकट ओढावले आहे. चाफळसह डोंगरी भागातील भातशेती वाळून गेल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत शासनाच्या नुकसानभरपाईच्या यादीतून भात पिकाला वगळण्यात आल्याने बाधित शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता

चाफळ विभागातील भातशेती पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी भाताची लागवड केली होती. मात्र, ऐन वाढीच्या टप्प्यावर पावसाने दडी मारल्याने जमिनीतील ओलावा संपला आहे. अनेक ठिकाणी भाताची रोपे पिवळी पडली असून वाढ पूर्णपणे खुंटली आहे. त्यामुळे बियाणे, खते, मशागत आणि मजुरीवर झालेला मोठा खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

सर्व पिकांचे पंचनामे करण्याची मागणी

शासनाकडून केवळ निवडक पिकांचा नुकसानभरपाईसाठी विचार केला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. भात हे डोंगरी भागातील प्रमुख पीक असल्याने केवळ तांत्रिक निकष न लावता प्रत्यक्ष शेतावर जाऊन सर्व पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत, अशी मागणी केली जात आहे. पिकांचे नुकसान झाले असल्यास ‘ग्राऊंड ट्रूथिंग’ करून भात उत्पादक शेतकऱ्यांना भरपाईच्या यादीत समाविष्ट करावे आणि दिलासा द्यावा, असा सूर व्यक्त होत आहे.

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!