स्थैर्य, सातारा, दि.२२: कोल्हापूरला जाणार्या दुचाकीस्वाराच्या हँडलला अडकवेली बॅग लिंबखिंड परिसरात पडली होती. दागिने व रोख रक्कम असा तीन लाख ऐवज असलेली ही बॅग सापडल्यानंतर प्रामाणिकपणे परत करणार्या दोन युवकांचा सातारा तालुका पोलिसांनी सत्कार केला.
याबाबत माहिती अशी, दि. 22 रोजी यशवंत हरि पाटील रा. कडगाव, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर हे कडगाव येथून मोटारसायकलवरून पत्नीसोबत पुणे येथे जात होते. यावेळी लिंबखिंड ते गौरीशंकर दरम्यान त्यांच्या मोटारसायकलच्या हॅन्डेलला अडकवलेली बॅग बंध तुटून पडली. या बॅगमध्ये सोन्याचे एक गंठण व एक नेकलेस असा एकूण अंदाजे सहा तोळे वजनाचे 3 लाख रुपयांचा ऐवज होता. बॅग पडल्याचे लक्षात येताच यशवंत पाटील यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात बॅग हरवल्याची माहिती दिली. घटनेची पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली होती. यानंतर पोलीस बॅगेबाबत इतरत्र शोध घेत होते.
यावेळी अपशिंगे, ता. सातारा गावातील अॅड. आशिष प्रल्हाद बुधावले व त्यांचे मित्र कल्याण नामदेव भोसले हे पोलिस ठाण्यात आले. त्यांनी कामानिमीत्त वाई याठिकाणी जात असताना लिंबखिड ते गौरीशंकर दरम्यान एक बॅग सापडली असल्याची माहिती दिली व या बॅगेमध्ये सोन्याचे दागिने आढळून आले असून ज्या कोणाची बॅग आहे त्याचा शोध घेवून त्याकडे सुपूर्द करण्याबाबत पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी संबंधितांना माहिती देवून त्याची खात्री करून त्यांना हे दागिने पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांच्या समक्ष ताब्यात देण्यात आले आहेत.
अॅड. आशिष प्रल्हाद बुधावले व कल्याण नामदेव भोसले दोघांनीही प्रामाणिकपणे राहून तसेच कोणतेही आमिष न बाळगता हा किंमती ऐवज पोलीस ठाण्यात आणून दिले. या प्रामाणिकपणाबद्दल पोनि सजन हंकारे व यशवंत हरी पाटील यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे आभार मानले व मनपूर्वक कौतुक केले.
पंतप्रधान आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आढावा घेणार