कास पठार मार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी दोन भीषण अपघात; महिला भाविकासह ४ जण गंभीर जखमी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

सातारा-कास पठार मार्गावर दोन वेगवेगळ्या अपघातांत महिला भाविकासह चौघे गंभीर जखमी झाले असून जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

स्थैर्य, सातारा, दि. ०४ ऑक्टोबर : सातारा-कास पठार मार्गावर पर्यटकांच्या आणि भाविकांच्या गाड्यांचे दोन वेगवेगळे अपघात घडले असून यात एका महिला भाविकासह चार जण गंभीर जखमी झाले आहेत. कास पठार आणि वजराई धबधबा परिसरात पर्यटनासाठी तसेच दर्शनासाठी येणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने हे अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सर्व जखमींवर सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

पहिली घटना: यवतेश्वर घाटात दुचाकीचा भीषण अपघात

पहिली घटना सातारा ते कास मार्गावरील यवतेश्वर घाटात घडली. कास पठाराच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव दुचाकीचा चालकाचा ताबा सुटल्याने दुचाकी रस्त्या कडेच्या सरंक्षक कठड्यावर जाऊन आदळली. या अपघातात दुचाकीवरील दोन तरुण गंभीर जखमी झाले. उपस्थितांनी तात्काळ रुग्णवाहिकेला पाचारण करून जखमींना सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

दुसरी घटना: कास पठाराजवळ चारचाकीची भाविकाला धडक

दुसरा अपघात कास पठाराजवळ घडला. दर्शनासाठी पायी जाणाऱ्या एका महिला भाविकाला पाठीमागून येणाऱ्या भरधाव चारचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात महिला आणि गाडीतील एक प्रवासी असे दोघे जण जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले. कास मार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वाहनचालकांना वेगावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केले आहे.

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!