
साताऱ्यातील राजवाडा परिसरात गणेश आगमनाच्या मिरवणुकीत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे हलत्या डायनासॉरच्या देखाव्याला अचानक आग लागून तो पूर्णपणे खाक झाला.
स्थैर्य, सातारा, दि. ०९ सप्टेंबर : साताऱ्यात गणेशोत्सव आगमन मिरवणुकीदरम्यान राजवाडा परिसरात एक मोठी दुर्घटना घडली. ‘सह्याद्रीचा राजा’ मंडळाच्या आगमन मिरवणुकीत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे हलत्या ‘डायनासॉर’च्या देखाव्याने अचानक पेट घेतला. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने तेथे उपस्थित हजारो भाविकांमध्ये एकच घबराट पसरून तारांबळ उडाली. सुदैवाने कार्यकर्त्यांची तत्परता आणि अग्निशमन दलाच्या वेळेवर मदतीमुळे मोठा अनर्थ टळला.
कार्यकर्त्यांची तत्परता अन् अनर्थ टळला
मिरवणूक राजवाडा बस थांबा परिसरात आली असताना फटाक्यांची ठिणगी पडल्याने डायनासॉरच्या प्रतिकृतीने पेट घेतला. घटनेचे गांभीर्य ओळखून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तातडीने आगीच्या ज्वाला पसरलेल्या ट्रॉलीपासून श्रींची मूर्ती, जनरेटर आणि ध्वनियंत्रणा सुरक्षितरीत्या बाजूला हलवली. कार्यकर्त्यांनी पाण्याचा मारा करत आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल होऊन आग पूर्णपणे आटोक्यात आणली.
जीवितहानी टळली; पोलिसांचा चोख बंदोबस्त
या संपूर्ण दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. पोलिसांनी तात्काळ बघ्यांची गर्दी पांगवून परिसरातील परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, यंदा शहरातील आगमन मिरवणुकांवर पोलीस प्रशासनाची करडी नजर असून ध्वनिवर्धकांच्या तीव्रतेवर डेसिबल मीटरद्वारे कडक नियंत्रण ठेवण्यात आले आहे.