सातारा जिल्ह्यात जलसंवर्धनाचा नवा टप्पा; १,१८२ इमारतींवर ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ यंत्रणा कार्यान्वित

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

भूजल पातळी वाढवण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने पुढाकार घेत जिल्ह्यातील १,१८२ इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा कार्यान्वित केली आहे.

स्थैर्य, सातारा, दि. १९ नोव्हेंबर : पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून भूजल पातळी वाढवण्यासाठी सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी मोठा पुढाकार घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील १ हजार १८२ इमारतींवर ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ (पावसाचे पाणी संकलन व पुनर्भरण) यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. उन्हाळ्यात अनेक गावांना जाणवणारी पाणीटंचाई आणि टँकरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी हा जलसंवर्धनाचा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे.

अभियानातून शासकीय व सार्वजनिक इमारतींवर भर

राज्य शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत जलसंधारण आणि पाणी व्यवस्थापनाला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी गावोगावी जनजागृती करून रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा उभारण्यास गती दिली. या अंतर्गत प्रामुख्याने शासकीय कार्यालये, शाळा, अंगणवाड्या आणि सार्वजनिक इमारतींच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

भूजल पुनर्भरणाला मिळणार मोठी चालना

या प्रणालीमध्ये इमारतीच्या छतावरील पावसाचे पाणी पाईपद्वारे एकत्र करून फिल्टरच्या मदतीने त्यातील कचरा आणि गाळ वेगळा केला जातो. त्यानंतर हे स्वच्छ पाणी साठवण टाकीत किंवा रिचार्ज विहीर, शोषखड्डे व बोअरवेलच्या पुनर्भरणासाठी सोडले जाते. यामुळे पावसाचे पाणी नाल्यावाटे वाहून जाण्याऐवजी थेट जमिनीत मुरून विहिरी व बोअरवेलची पाणीपातळी टिकवून ठेवण्यास मदत होणार आहे. हा उपक्रम केवळ आकडेवारीपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष जलसंधारणाचे मूल्यमापन होणे आणि नागरिकांनीही यात उत्स्फूर्त सहभाग घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!