
थेट WhatsApp वर मिळवा
सातारा जिल्हा बँकेतील बिनविरोध निवडीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया देत सहकारातील राजकारणावर जोरदार टीका केली आहे.
स्थैर्य, सातारा, दि. ०८ ऑक्टोबर : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवड झाल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी ‘जलमंदिर पॅलेस’ या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. बँकेतील निवडीमागे कोणतीही जादू नसून लोकांचे प्रेम आणि विश्वास यामुळेच ही निवड बिनविरोध झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सहकार क्षेत्रात राजकारण आणल्यामुळेच राज्यातील अनेक सहकारी संस्था डबधाईस आल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
सहकार चळवळीत राजकारण नको
खासदार भोसले म्हणाले, महाराष्ट्रात सहकार चळवळ मोठ्या प्रमाणावर रुजली आहे. मात्र, ज्या ठिकाणी राजकारण घुसले, तेथील संस्था अवसायनात निघाल्या. सातारा जिल्हा बँक ही नावारूपाला आलेली आणि विविध पारितोषिके मिळवणारी संस्था आहे. त्यामुळे अशा यशस्वी बँकेत कोणत्याही प्रकारचे राजकारण आणू नये. लोकप्रतिनिधींनी शेतकरी व कष्टकऱ्यांचे हित जोपासणे आवश्यक असून, लोकहिताविरोधात भूमिका घेतल्यास जनता पाठिंबा देणार नाही.
दुष्काळ आणि बँकेच्या निवडणुकीचा संबंध नाही
खासदार सुप्रिया सुळे यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका पुढे ढकलण्याबाबत मांडलेल्या भूमिकेवर बोलताना, दुष्काळ आणि जिल्हा बँक निवडणुकीचा काहीही संबंध नाही, असे सांगत निवडणुकांबद्दलचा निर्णय शासन घेईल असे भोसले यांनी नमूद केले. सर्वसामान्यांची उन्नती, उत्कर्ष आणि भावी पिढीची प्रगती याच्याशीच आपली बांधिलकी असल्याचे त्यांनी शेवटी स्पष्ट केले.



