सातारा जिल्हा बँक निवडणूक : विरोधकांचे ‘चक्रव्यूह’ भेदून जिल्हा बँकेत दिसणार रणजितदादा व समशेरदादा ?; १ तारखेच्या मतदानाकडे जिल्ह्याचे लक्ष

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

सातारा जिल्हा बँकेच्या फलटण सोसायटी मतदारसंघात समशेरसिंह आणि संजीवराजे यांच्यात चुरशीची लढत होत असून चेअरमनपदाच्या शर्यतीत रणजितसिंह आघाडीवर आहेत.

स्थैर्य, फलटण, दि. २९ ऑक्टोबर : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे धुमशान आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष माण आणि फलटण तालुका सोसायटी मतदारसंघातील ‘हाय व्होल्टेज’ लढतीकडे लागले आहे. फलटण सोसायटी मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर निवडणूक लढवत आहेत; तर त्यांच्या विरोधात आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेकडून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामुळे ही लढत जिल्ह्याच्या राजकारणात सर्वाधिक प्रतिष्ठेची बनली आहे.

चेअरमनपदाच्या शर्यतीत रणजितदादा आघाडीवर

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची ‘नागरी बँका व पतसंस्था’ या मतदारसंघातून नुकतीच संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. या मोठ्या विजयामुळे भाजप आणि रणजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, या बिनविरोध निवडीनंतर आता सातारा जिल्हा बँकेच्या चेअरमनपदाच्या शर्यतीत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव अग्रक्रमाने आणि आघाडीवर घेतले जात आहे.

विरोधकांचे ‘चक्रव्यूह’ उध्वस्त; अनिकेतराजेंना मतदानाचाही अधिकार नाही

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर विरोधकांनी रचलेले राजकीय ‘चक्रव्यूह’ भेदण्यात रणजितदादा पूर्णपणे यशस्वी ठरले आहेत. विधानसभा, नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये त्यांनी अचूक रणनीती आखत विरोधकांना अक्षरशः भुईसपाट केले. आता जिल्हा बँकेतही विरोधकांनी कितीही मोठे चक्रव्यूह रचले असले, तरी समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देऊन रणजितदादांनी विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा पक्का निश्चय केला आहे.

यापूर्वीच राजे गटाला एक मोठा धक्का बसला आहे. आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे सुपुत्र तथा फलटणचे नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांचा धुळदेव सोसायटीतून होणारा ठराव तिथल्या सदस्यांनी कडाडून विरोध करत बहुमताने फेटाळून लावला आहे. परिणामी, अनिकेतराजे हे आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीत साधे मतदारही राहू शकलेले नाहीत.

संचालक मंडळात दिसणार दोन सख्खे भाऊ!

जर फलटण तालुका सोसायटी मतदारसंघातून भाजपचे समशेरसिंह नाईक निंबाळकर विजयी झाले, तर यंदाच्या सातारा जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि समशेरसिंह नाईक निंबाळकर हे दोन सख्खे भाऊ संचालक म्हणून एकत्रित पाहायला मिळतील. मागील संचालक मंडळात मंत्री मकरंद पाटील व त्यांचे बंधू खासदार नितीन पाटील यांची जोडी होती; यंदाच्या मंडळात हे चित्र रणजितदादा व समशेरदादांच्या रूपाने दिसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

शेवटच्या क्षणी डाव पलटवण्याची रणजितदादांची ख्याती

राजकीय रणनीती आखण्यात आणि ती यशस्वीरीत्या राबवण्यात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे अतिशय वाकबदार आहेत. विधानसभा, नगरपरिषद ते जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा इतिहास पाहता, अगदी शेवटच्या क्षणी अचूक खेळी करून डाव पूर्णपणे पलटवण्याची रणजितदादांची ख्याती आहे. आता सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी येत्या १ तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार असून, ३ तारखेला मतमोजणी संपन्न होणार आहे.

त्यामुळे मतदानाला अवघे दोन-तीन दिवस उरले असताना रणजितदादांची अखेरची रणनीती कशी चालते आणि कोण बाजी मारते, हे अवघ्या काही दिवसांतच संपूर्ण जिल्ह्याला पाहायला मिळणार आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!