पुणे पदवीधरमध्ये मविआचा झेंडा; हर्षदा देशमुख कशा जिंकल्या?

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

पुणे पदवीधर निवडणुकीत मविआच्या हर्षदा देशमुख यांनी भाजपला धक्का देत मोठा विजय मिळवला. या विजयामागील प्रमुख कारणे, अचूक रणनीती व राजकीय समीकरणांची माहिती.

स्थैर्य, पुणे, दि. २९ ऑक्टोबर : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अनेक वर्षांचा भाजपचा बालेकिल्ला महाविकास आघाडीने खेचून आणला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) उमेदवार हर्षदा देशमुख यांनी भाजपच्या स्मिता जाधव यांचा पराभव करत लक्षवेधी विजय मिळवला. अचूक रणनीती आणि भक्कम राजकीय पाठबळ यामुळे मिळालेल्या या विजयामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे.

दीड वर्षांची पूर्वतयारी आणि अचूक नियोजन

हर्षदा देशमुख यांनी गेल्या दीड वर्षांपासून पदवीधर निवडणुकीची तयारी सुरू केली होती. पाचही जिल्ह्यांमध्ये फिरून त्यांनी पदवीधरांची मोठ्या प्रमाणावर नोंदणी करून घेतली. दुसरीकडे भाजपने ऐनवेळी स्मिता जाधव यांना उमेदवारी दिल्याने मतदारांमध्ये संभ्रम होता. हर्षदा यांचे उच्च शिक्षण आणि माजी प्रशासकीय अधिकारी असलेल्या त्यांच्या वडिलांच्या (प्रभाकर देशमुख) अनुभवाचा त्यांना प्रचारात मोठा फायदा झाला. त्यांनी दुष्काळ, रोजगार आणि एमपीएससीसारख्या प्रश्नांना थेट हात घालत तरुणांची मते खेचून आणली.

महाविकास आघाडीची एकी अन् सतेज पाटील फॅक्टर

या निवडणुकीत महाविकास आघाडीने भक्कम एकी दाखवली. सोलापूर जिल्ह्यातून खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोठी ताकद लावली. तसेच, आमदार सतेज पाटील यांनी ‘गोकुळ’ पॅटर्न राबवत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. विशेष म्हणजे, हर्षदा यांचा जन्म सोलापूरचा, मूळ गाव साताऱ्याचे, शिक्षण कोल्हापुरात, आजोळ सांगलीचे आणि सासर पुण्याचे असल्याने त्यांचा पाचही जिल्ह्यांशी थेट संबंध होता. या सर्वंकष संपर्काचा त्यांना निवडणुकीत नैसर्गिक फायदा मिळाला.

राजकीय समीकरणांना नवे वळण

या विजयामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला साताऱ्यातून पुन्हा एकदा प्रतिनिधित्व मिळाले आहे. माण – खटावमध्ये मंत्री जयकुमार गोरे यांच्या वर्चस्वाला यामुळे मोठा धक्का मानला जात आहे. थेट मुद्द्यांना हात घालणारी प्रभावी वक्तृत्वशैली, आई-वडिलांचे मजबूत नेटवर्क आणि मित्रपक्षांची भक्कम साथ यामुळे हर्षदा देशमुख यांनी भाजपच्या तगड्या यंत्रणेसमोर हा ऐतिहासिक विजय मिळवला.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!