
थेट WhatsApp वर मिळवा
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जांच्या छाननीत फलटण विकास सोसायटी मतदारसंघातील सर्व अर्ज पात्र ठरले आहेत. यामुळे तालुक्यात संजीवराजे विरुद्ध समशेरसिंह नाईक निंबाळकर अशा मोठ्या लढतीची शक्यता निर्माण झाली आहे.
स्थैर्य, फलटण, दि. ०५ ऑक्टोबर : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यामध्ये फलटण विकास सोसायटी मतदारसंघातील सर्व उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले असून, राजकीय वर्तुळात आता आगामी लढतीबाबत चर्चांना उधाण आले आहे.
‘या’ नेत्यांचे अर्ज ठरले पात्र
छाननी प्रक्रियेनंतर फलटण विकास सोसायटी मतदारसंघातून विधान परिषदेचे माजी सभापती आणि आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि जिल्हा बँकेचे माजी संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर-निंबाळकर यांच्या इतर सर्वच उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.
श्रीमंत संजीवराजे विरुद्ध समशेरसिंह लढतीची चर्चा
या मतदारसंघातून दिग्गज नेत्यांचे अर्ज पात्र ठरल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे. सद्यस्थितीत फलटण तालुक्याच्या राजकीय वर्तुळात श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर विरुद्ध समशेरसिंह नाईक निंबाळकर अशी थेट लढत होण्याची मोठी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या महत्त्वपूर्ण निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.





