
थेट WhatsApp वर मिळवा
सातारा जिल्ह्यातील भुईंज आणि परिसरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने वेगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि घरटी पाहणी मोहीम सुरू केली आहे.
स्थैर्य, सातारा, दि. ०४ ऑक्टोबर : वाई तालुक्यातील भुईंज पंचक्रोशीमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव वेगाने पसरत असल्याच्या तक्रारींनंतर जिल्हा आरोग्य विभाग पूर्णपणे अलर्ट मोडवर आला आहे. परिसरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आरोग्य विभागाच्या पथकांनी भुईंज आणि लगतच्या गावांमध्ये थेट घरोघरी जाऊन पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. डासोत्पत्तीची ठिकाणे शोधून ती नष्ट करणे तसेच संशयित रुग्णांचे तात्काळ रक्ताचे नमुने घेऊन उपचार सुरू करण्यावर आरोग्य यंत्रणेने भर दिला आहे.
डासोत्पत्ती कारणे शोधण्यावर भर; धूर फवारणी सुरू
आरोग्य कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांच्या मदतीने भुईंज परिसरातील साचलेले पाणी, पाण्याचे हौद, ड्रम आणि उघड्यावरील पाण्याच्या साठ्यांची कसून तपासणी केली जात आहे. ज्या ठिकाणी एडिस डासांच्या अळ्या आढळून येत आहेत, तेथे तात्काळ कीटकनाशकांची फवारणी करण्यात येत असून अळीनाशक औषधे टाकली जात आहेत. याशिवाय ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात नियमित धूर फवारणी (फॉगिंग) करून डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न तीव्र करण्यात आले आहेत.
नागरिकांना कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन
परिसरात डेंग्यूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य प्रशासनाने नागरिकांचे सहकार्य मागितले आहे. घरातील पाण्याचे साठे आठवड्यातून एकदा पूर्णपणे रिकामे करून स्वच्छ वाळवावेत आणि आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळावा, असे आवाहन आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे. तसेच ताप, अंगावर पुरळ, डोकेदुखी किंवा तीव्र सांधेदुखी अशी लक्षणे दिसल्यास अंगावर न काढता लागलीच जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी, असा सल्ला वैद्यकीय पथकाने दिला आहे.





