
थेट WhatsApp वर मिळवा
आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या साहील जाधव, ऋतुजा पिसाळ व सुदेष्णा शिवणकर यांचा साताऱ्यात भव्य गौरव रॅली काढून नागरी सत्कार करण्यात आला.
स्थैर्य, सातारा, दि. ०५ ऑक्टोबर : जपानमधील नागोया येथे पार पडलेल्या २० व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सातारा जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंचा आणि त्यांच्या मार्गदर्शकांचा जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने भव्य गौरव करण्यात आला. या स्पर्धेत साहील जाधव याने आर्चरीतील कंपाऊंड प्रकारात दोन सुवर्ण पदके, ऋतुजा पिसाळ हिने हॉकीमध्ये सुवर्ण पदक पटकावले, तर सुदेष्णा शिवणकर हिने ४×१०० मीटर रिलेत उत्कृष्ट कामगिरी करत चौथा क्रमांक मिळवला.
उत्साहात निघाली भव्य गौरव रॅली
या सर्व गुणवंत खेळाडूंचा सत्कार करण्यासाठी गांधी मैदान, राजवाडा ते श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल दरम्यान भव्य गौरव रॅली काढण्यात आली. कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, क्रीडा व युवक सेवा उपसंचालक सुहास पाटील, शिक्षणाधिकारी शबनम मुजावर आणि जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचिन्ह, शाल व गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
खेळातील पदक ए.आय. देऊ शकत नाही
आरोग्य सुदृढ राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी आयुष्यात किमान एक तरी खेळ खेळला पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे म्हणाले, “कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ए.आय. सर्व काही करू शकते, परंतु ती खेळातील पदक मिळवून देऊ शकत नाही; त्यामुळे विद्यार्थ्यांनी खेळाचा मनमुराद आनंद घेतला पाहिजे.” या गौरव सोहळ्यास हजारोच्या संख्येने नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते.





