‘यशवंतराव’च्या विद्यार्थ्यांकडून शहरात वृक्षरोपांचे वाटप; कै. सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांना अनोखे अभिवादन

श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या उपक्रमांतर्गत फलटण शहरातील व्यावसायिकांना दिले रोप; पर्यावरण संवर्धनाचा संदेश


स्थैर्य, फलटण, दि. २२ ऑगस्ट : श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कै. सुभाषराव नामदेवराव सूर्यवंशी (बेडके), अर्थात ‘काका’ यांच्या जयंती व स्मृतिदिनानिमित्त सोसायटीच्या यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून शहरातील व्यावसायिक वर्गाला प्रशालेतील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या हस्ते वृक्षरोपांचे वाटप करण्यात आले.

कै. सुभाषराव सूर्यवंशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दि. १८ ते २१ ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच अनुषंगाने, प्रशालेच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी फलटण शहरातील दुकाने आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांना भेट देऊन प्रत्येकी एक रोप दिले. या अभिनव उपक्रमातून भावी पिढीमध्ये पर्यावरण संवर्धनाची आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

प्रशालेच्या वतीने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे व्यावसायिक वर्गातून मोठ्या प्रमाणात कौतुक झाले व सर्वांनी प्रशालेचे आभार मानले. या कार्यक्रमात प्रशालेतील सर्व विभाग प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

सदर उपक्रमांचे नियोजन प्रशालेच्या प्राचार्या एन. एम. गायकवाड, उपप्राचार्य पी. डी. घनवट आणि पर्यवेक्षिका सी. आर. रणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!