दैनिक स्थैर्य । दि. ०८ मे २०२३ । फलटण । येथील अहिल्यानगर (गजानन चौक) येथील श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या श्री स्वामी समर्थ मंदिराच्या 25 व्या वर्धापनदिनानिमित्त श्रीं च्या चांदीच्या मुखवट्याचा संकल्पपूर्ती पूजन सोहळा सोमवार, दि.8 मे रोजी विविध कार्यक्रमांनी संपन्न होणार असल्याची माहिती मंडळाचे प्रमुख संजय चोरमले यांनी दिली.
याबाबत सविस्तर माहिती देताना चोरमले यांनी सांगितले की, श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्यावतीने विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते. मंडळाने स्वामी भक्तांच्या सहकार्याने श्रीं चा रथ, पालखी व चांदीचा मुखवटा करण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार ही संकल्पपूर्ती झाली असून मंदिराच्या 25 व्या वर्धापनदिनानिमित्त सोमवार, दि.8 मे रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूळ पादूका दर्शन व मुखवटा पूजन सोहळा अक्कलकोट समाधी मठ येथील चोळप्पा महाराजांचे वंशज अण्णू महाराज प्रभाकर पुजारी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. सदर दिवशी सकाळी 8:30 ते 11:30 या वेळात श्रींच्या चांदीच्या मुखवट्याचे अभिषेक व पूजन, दुपारी 12:30 वा. नैवेद्य व आरती, दुपारी 3 ते 5 महिला भजन, सायंकाळी 5 ते 7 श्रीं ची मिरवणूक, सायं.7:30 वा. आरती व रात्री 8 ते 10 भजन असे धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. तरी या सर्व कार्यक्रमांचा लाभ स्वामी भक्तांनी घ्यावा, असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.