पुसेसावळीत चक्क गाढवांवरून वाळू तस्करी, महसूलचा कानाडोळा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्थैर्य, पुसेसावळी, दि ७ : गेल्या अनेक दिवसांपासून येथील परिसरात दिवसाढवळ्या गाढवांचा वापर करून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरू आहे. नांदनी नदी व इतर छोट्या-मोठ्या ओढ्यांवरून धनदांडग्या लोकांनी गाढव मालकांच्या साह्याने गाढवांचा वापर करून दिवसाला हजारो रुपये कमावण्यासाठी हा व्यवसाय सुरू केला आहे. वाळूउपसा करणारे गाढवमालक त्यांच्या लहान मुलांना यात पुढे करत आहेत. याबाबत महसूल प्रशासनाने कानाडोळा केलेला असून, पोलिस प्रशासनाने गांधारीची भूमिका घेतली आहे.

ग्रामीण भागातून गाढव नावाचा प्राणी नामशेष होत असताना सध्याच्या कोरोना आणि लॉकडाउन काळात याच गाढवांना ग्रामीण भागात मोठा भाव आला आहे. पूर्वी ग्रामीण भागात सर्रास गाढव हा प्राणी मोठ्या प्रमाणात आढळून येत होता. 20 वर्षांपूर्वी गावाच्या आजूबाजूला दिसणारी गाढवे काळाच्या ओघात कुठेही दिसेनाशी झाली आणि त्यांच्यावर उदरनिर्वाह करणारी कुटुंबे रोजगार आणि इतर व्यवसाय करून पोट भरू लागली. मात्र, मार्च महिन्यात कोरोना साथीचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि गाढवांना सोन्याचे दिवस आले असेच म्हणावे लागेल. लॉकडाउनमुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले, नोकऱ्या गेल्या, व्यवसायही थांबले. मात्र, गाढवमालकांची मात्र चांदी सुरू झाली हो चक्क चांदी… दिवसाला पाच ते सात हजार रुपये मिळवून देणारी गाढवे विकत घेण्यासाठी चक्क चढाओढ सुरू झाली आणि सात-आठ गाढवे घेऊन नवीन व्यवसाय सुरू झाला. 

पुसेसावळी परिसरात गाढवांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होत असून, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. कोरोना साथीच्या नियंत्रणात सर्व प्रशासन मोठ्या विश्वासाने झटत असताना दुसरीकडे गाढवांचा वापर करून मोठ्या प्रमाणात वाळू माफियांची टोळी ग्रामीण भागात निर्माण झाली आहे. दिवसाला गाढव हजारो रुपये कमाई करून देत असल्याने आता ग्रामीण भागात एका विशिष्ट समाजाच्या लोकांना हाताशी धरून हा व्यवसाय गावातीलच धनदांडगे लोक करू लागले आहेत. याकडे सध्या प्रशासनाची डोळेझाक झाली आहे की काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. 

पुसेसावळी व परिसरात गाढवांच्या माध्यमातून वाळूउपसा होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. याबाबत आमच्या वरिष्ठांशी चर्चा करून अशा लोकांवर कोणती कारवाई करता येईल, याबद्दल चर्चा सुरू आहे. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!