गिरवीची लेक सांभाळणार हिंजवडी मेट्रोचे सारथ्य; विश्वांजली कदम ठरल्या ‘मेट्रो ३’च्या लोको पायलट

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

पुण्याच्या बहुप्रतिक्षित हिंजवडी-शिवाजीनगर ‘मेट्रो ३’चे उद्घाटन मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून, याच मार्गावरील मेट्रोचे सारथ्य फलटण तालुक्यातील गिरवी गावातील विश्वांजली कदम करणार आहेत. संगणक अभियंता असलेल्या विश्वांजली यांच्या या यशामुळे गिरवी परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थैर्य, गिरवी, दि. ०३ नोव्हेंबर : आयटी पार्क आणि पुण्याच्या मध्यवर्ती भागाला जोडणाऱ्या बहुप्रतिक्षित हिंजवडी-शिवाजीनगर ‘मेट्रो ३’चे उद्घाटन मंगळवारी (दि. ३ नोव्हेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. या महत्त्वाच्या मेट्रो मार्गावर लोको पायलट (मेट्रो चालक) म्हणून फलटण तालुक्यातील गिरवी येथील पै. वरसेन कदम यांची कन्या विश्वांजली कदम जबाबदारी सांभाळणार आहेत.

शैक्षणिक पार्श्वभूमी आणि करिअरचा प्रवास

विश्वांजली यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी पुण्यात संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. पुढे पारंपारिक वाटेपेक्षा वेगळा मार्ग स्वीकारत त्यांनी मेट्रो लोको पायलट पदाची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली. संगणक अभियंता असलेली तरुणी थेट अत्याधुनिक मेट्रो चालवणार असल्याचा हा योगायोग अत्यंत लक्षवेधी ठरला आहे.

महिला सक्षमीकरणाचा नवा टप्पा

‘पुणेरी मेट्रो’ आणि ‘पिंक लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मार्गावरील सर्व गाड्या सुमारे शंभर प्रशिक्षित महिला ट्रेन ऑपरेटर्स चालवणार आहेत, अशी माहिती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधान्य प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी जाहीर केली आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या या विशेष चमूत गिरवीच्या विश्वांजली यांचा समावेश आहे. पीएमआरडीएच्या माध्यमातून सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर उभारलेला हा मार्ग माण (हिंजवडी) ते शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयापर्यंत आहे. बुधवारपासून (दि. ४ नोव्हेंबर) या मार्गावर प्रत्यक्ष प्रवासी सेवा सुरू होणार आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!