
स्थैर्य, फलटण, दि. २ नोव्हेंबर : अखिल भारतीय समता परिषदेचा ३३ वा वर्धापन दिन फलटण येथील लोकमान्य नर्सिंग होम येथे उत्साहात पार पडला. परिषदेचे सातारा जिल्हा अध्यक्ष डॉ. बी. के. यादव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात, हॉस्पिटलमधील रुग्णांना फळे वाटप करून सामाजिक उपक्रम राबवण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी गिरीश बनकर, दशरथ फुले, रमेश शिंदे यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल रासकर यांनी केले, तर आभार महादेवराव सोनवलकर यांनी मानले.
यावेळी बोलताना डॉ. बी. के. यादव म्हणाले, “महात्मा फुले म्हटले की मला दोनच नावे समोर येतात, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले. छत्रपतींनी तलवारीच्या ताकदीवर स्वराज्य निर्माण केले, आणि फुलेंनी लेखणीच्या बळावर समाजप्रबोधनाची क्रांती घडवली.”
ते पुढे म्हणाले, “पॅरॅलिसिस झाल्यानंतरही त्यांनी ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा ग्रंथ समाजाला दिला. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र समाजासमोर आणणारे तेच होते.” महात्मा फुले यांच्या कार्यात लहुजी वस्ताद साळवे यांचा मोठा वाटा असल्याचा उल्लेखही डॉ. यादव यांनी केला.
या कार्यक्रमास कापसी सोसायटीचे विजयराव यादव, लोकमान्य उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक जगताप, लोकमान्य पतसंस्थेचे चेअरमन घनवट, डॉ. अमित मोरे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. संपदा मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

