साखरवाडी | छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे आयुष्य जनतेवरील अन्याय दूर करण्यासाठी घालवले : छत्रपती उदयनराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २३ ऑगस्ट २०२४ | फलटण | संपूर्ण भारत देशासह जगाला सर्व धर्म समभाव व बंधुत्वाचा विचार जर कोणी दिला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला असून शिवाजी महाराज हे फक्त आपल्या देशापुरते मर्यादित नाहीत; जगभरातील मोठमोठे योद्धे व छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कधीही होऊ शकत नाही. कारण त्या त्या योद्धांनी आपली हयात हे आपले साम्राज्य वाढवण्यासाठी घालवली मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य हे सर्वसामान्य जनतेला केंद्र बिंदू मानून त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी वेचल्याचे प्रतिपादन सातारा लोकसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी साखरवाडी ता फलटण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याच्या अनावर प्रसंगी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील काटकर, धैर्यशील अनपट, श्रीदत्त इंडियाचे प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप, पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर, धनंजय पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

सुभेदार मल्हारराव होळकर यांचा सुद्धा भव्य – दिव्य पुतळा मुरूममध्ये उभारणार

यावेळी बोलताना श्रीमंत रामराजे म्हणाले कि; संपूर्ण फलटण तालुक्यात या अश्वारूढी पुतळ्या इतका सुंदर पुतळा इतर कोणत्याही गावात माझ्या तरी बघण्यात नसून हा पुतळा साखरवाडीकरांचे वैभव आहे. आता हे वैभव कसं टिकवायचे हे तुमच्या हातात असून या पुतळ्याची व्यवस्था बघण्यासाठी गावातील तरुणांनी पुढे येऊन जबाबदारी घ्यावी! यामध्ये कोणतेही राजकारण कोणी आणू नये. राजकारणाच्या वेळीस आपण निश्चित राजकारण करू साखरवाडीच्या नजीकच असणाऱ्या मुरूम या गावात पेशव्यांचे अतिशय शूर लढाऊ सुभेदार मल्हारराव होळकर यांचे जन्मस्थळ असून या ठिकाणी ही लवकरच मल्हारराव होळकरांचा पुतळा शासनाच्या मदतीने उभारणार असल्याचे व याही पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी श्रीमंत उदयनराजे भोसले यांनाच आजच आमंत्रण देत असल्याचे सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा खंबीरपणे चालवला जातोय

साखरवाडी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होण्यासाठी आपण सर्व शिवप्रेमी आतुरतेने वाट पाहत होतो तो ऐतिहासिक क्षण आज आला असून छत्रपती शिवाजी महाराजांनी अन्यायाविरोधात पेटून उठणारा कर्तृत्ववान राजाचा पुतळा आपल्यासमोर उभा राहिला असून छत्रपती घराण्याचे वारसदार असणारे उदयनराजे भोसले यांच्याकडूनही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा खंबीरपणे चालवला जात असल्याने आम्हाला याचा सार्थ अभिमान असल्याचे मत आमदार दीपक चव्हाण यांनी व्यक्त केले.

खासदार छत्रपती उदयनराजेंच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण हे आपले भाग्य

प्रास्ताविकात श्रीमंत संजीवराजे म्हणाले कि; १२ वर्षांपूर्वी गावातील काही तरुणांनी या ठिकाणी भव्य असा अश्वारूढी पुतळा उभारण्याची मागणी श्रीमंत रघुनाथराजे यांच्याकडे केली होती. श्रीमंत रघुनाथराजेंनी पुढाकार घेऊन पुण्यातील प्रसिद्ध शिल्पकार राम व शाम माळी यांना पुतळा उभारण्याचे काम दिले होते. ते काम पूर्ण झाल्यानंतर कायदेशीर अडचणी दूर करून या पुतळ्याच्या अनावरणासाठी सुमारे दहा वर्षांचा काळ लागला आहे. मात्र या पुतळ्याचे अनावरण छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज तथा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते होत असल्याने ते आपले परम भाग्य आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर नेमाने यांनी केले. कार्यक्रमाला शिवाजी महाराज उत्सव समिती चे सर्व सदस्य कार्यकर्ते व साखरवाडी परिसरातील हजारो शिवप्रेमी उपस्थित होते

साखरवाडीत स्टॅन्ड नावाचा तीर्थक्षेत्र!

आपल्या भाषणात श्रीमंत रामराजे यांनी साखरवाडीत स्टॅन्ड नावाचा एक तीर्थक्षेत्र असून या तीर्थक्षेत्रा मुळे इतर दहा ते बारा गावांच्या डोक्याला फार मोठा ताप असल्याचे सांगितले आता याच स्टॅन्ड समोर हा पुतळा असल्याने महाराज आपल्याकडे बघत आहेत; आता तरी नीट वागा व लवकर घरी जा! असा खोचक टोला यावेळी श्रीमंत रामराजे यांनी लगावला.


Back to top button
Don`t copy text!