दैनिक स्थैर्य | दि. 24 एप्रिल 2024 | फलटण | लोकसभा निवडणुकीचे पडघम सध्या माढा लोकसभा मतदारसंघात वाजत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी माजी आमदार स्व. चिमणराव कदम यांचे सुपुत्र युवा नेते सह्याद्री चिमणराव कदम यांची भूमिका अद्यापही गुलदस्तात आहे. नक्की कोणती भूमिका सह्याद्री कदम जाहीर करणार याकडे आता फलटण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
माढा लोकसभा मतदारसंघांमधून भारतीय जनता पार्टीच्या वतीने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे रिंगणात आहे. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने धैर्यशील मोहिते – पाटील रिंगणात आहेत. रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते – पाटील अशी थेट लढत होणार आहे. यामध्ये लोकसभा निवडणुकीत युवा नेते सह्याद्री कदम नक्की कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
गत काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीचे नेते श्रीकांत भारतीय यांनी मुंबई येथे सह्याद्री चिमणराव कदम यांना बोलावून घेत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा केली असल्याची माहिती समोर आली होती. सह्याद्री चिमणराव कदम हे भारतीय जनता पार्टीमध्ये गतकाही वर्षांपूर्वीपासून कार्यरत आहेत. आता लोकसभेसाठी नक्की त्यांची भूमिका काय असणार आहे; याबाबत विविध चर्चा सध्या फलटण तालुक्यात सुरू आहेत.
काल फलटण येथील सह्याद्री कदम यांच्या निवासस्थानी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी सदिच्छा भेट दिली आहे. यावेळी विविध विषयांवर विजयसिंह मोहिते – पाटील व सह्याद्री कदम यांच्यामध्ये चर्चा झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये नेमकी सह्याद्री कदम कोणती भूमिका घेणार याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.
यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते – पाटील यांनी सह्याद्री चिमणराव कदम यांची उमेदवारी घोषित होण्यापूर्वी फलटण येथील निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांच्या चर्चा झाल्या होत्या.
माजी आमदार स्व. चिमणराव कदम यांना मानणारा मोठा वर्ग फलटण तालुक्यामध्ये आहे. या गटाचे नेतृत्व सध्या सह्याद्री चिमणराव कदम हे सक्षमपणे करीत आहेत. चिमणराव कदम हे फलटण मतदारसंघांमधून विधानसभेवर प्रतिनिधित्व करीत होते. विधानसभेमध्ये एक अभ्यासू आमदार व सातारा जिल्ह्याचे नेते अशी त्यांची ओळख होती. चिमणराव कदम यांचा वारसा सक्षमपणे पुढे सह्याद्री कदम हे चालवत आहेत. आगामी तालुक्याच्या राजकारणाचा विचार करता सह्याद्री चिमणराव कदम हे नक्की लोकसभेसाठी कोणासोबत जातात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
या सर्व गोष्टींचा विचार करता सह्याद्री चिमणराव कदम यांची भूमिका गुलदस्तात असून नक्की काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.