स्थैर्य, सातारा, दि.२५: नाटक असो मालिका असो की चित्रपट मनोरंजनाच्या वेगवेगळ्या माध्यमात आपल्या विनोदाची खणखणीत छाप पाडणारा, चला हवा येऊ द्या या मालिकेतून रसिक प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलेला अभिनेता सागर कारंडे कोल्हापूर, सांगली, सातारामध्ये येत आहे. ‘इशारो इशारो में’ या रोमँटिक कॉमेडी नाटकाचे प्रयोग होणार असून त्याबाबतची माहिती त्यांनी सातारा येथील पत्रकार परिषदेत दिली.
त्याच्या आतापर्यंतच्या भूमिकांपेक्षा काहीशी वेगळी भूमिका तो या नाटकात साकारत आहे. अबोल मनाचा बोलका अविष्कार म्हणजे इशारो इशारों में असं या नाटकाबद्दल म्हणाव लागेल. या नाटकात विनोद आहे. रोमान्स आहे, भावनेला हात घालणारे प्रसंग आहेत. तरीही जरासं वेगळेपणही आहे. एक बोलका आणि एक अबोल या दोन जिवांच्या प्रेमाची ही एक गोष्ट आहे. एका व्यक्तीला कोणाचा एक शब्दही ऐकू येत नाही, सारंच डोळ्यांनी समजून घ्यायचा आहे, अशा व्यक्तीचा आवाज सुरू होऊन हे नाटक मनाला हळवं करतं. ‘इशारा इशारा मा’ या मूळ गुजराती नाटकाचा हा मराठी नाट्याविष्कार आहे. कॉम्प्युटर इंजिनिअर असलेल्या सागर कारंडेने 2002 साली पहिल्यांदा रंगभूमीवर पाऊल टाकले. त्याच्या अभिनयातील वेगळेपणाने नेहमीच प्रेक्षकांना काहीतरी अनोखे दिले आहे. अल्पावधीतच हे नाटक मुंबई-पुण्यातील रसिकांच्या पसंतीस उतरलेले आहे. सरगम क्रिएशन्स निर्मित सई इंटरटेनमेंट प्रस्तुत इशारो इशारो मे या नाटकाची मूळ संकल्पना व दिग्दर्शन जय कापडीया यांचे आहे. याचे मूळ लेखक प्रयाग दवे असून मराठीमध्ये स्वप्नील जाधव यांनी रूपांतर केले आहे. सुप्रसिद्ध संगीतकार राहुल रानडे यांनी या नाटकाला संगीतबद्ध केले आहे. अजय पुजारे यांनी नेपथ्याची बाजू सांभाळलेली आहे. अजय कासुर्डे यांनी या नाटकाची निर्मिती केलेली आहे. सागर कारंडे सोबत उमेश जगताप, संजना हिंदुपूर, शशिकांत गंगावणे, अव्यान मेहता यांच्याही भूमिका यामध्ये आहेत. शुक्रवार दिनांक 2 एप्रिल सायं 7 वाजता केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूर शनिवार दिनांक 3 एप्रिल सायं 7 वा विष्णुदास भावे नाट्य मंदिर सांगली आणि शनिवार रविवार दिनांक 4 एप्रिल सायंकाळी 7 वा शाहू कला मंदिर सातारा असे या नाटकांचे आयोजन पश्चिम महाराष्ट्रात करण्यात आलेले आहे.