निंभोऱ्यात उड्डाण पूलाची उभारणी करुन स्थानिक वाहतूकीला सुरक्षितता निर्माण करावी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, फलटण, दि. ७: आळंदी-पंढरपूर-मोहोळ या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 वरील फलटण ते लोणंद दरम्यानच्या निंभोरे ता. फलटण येथे उड्डान पूलाची उभारणी करुन तेथील स्थानिक वाहतूकीला सुरक्षितता निर्माण करुन द्यावी अशी मागणी निंभोरे व परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. आळंदी-पंढरपूर-मोहोळ या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 मार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून या मार्गाची निविदा काढण्यात आली आहे. 

आगामी काळात या महामार्गाचे काम सुरु होणार असल्याने निंभोरे व परिसरातील ग्रामस्थांनी सदरची मागणी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचेकडे केल्यानंतर त्यांनी परिसरातील 8/10 ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ठरावाद्वारे सदरची मागणी करण्याबरोबरच आपण स्वत: केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री ना. नितिन गडकरी यांच्याशी बोलुन ग्रामस्थांच्या या मागणीची सविस्तर माहिती व ग्रामपंचायत ठरावाची प्रत त्यांना समक्ष देवून उड्डाण पूलाची आवश्यकता पटवून देवू आणि सदर उड्डाण पूल मंजूर करुन घेण्याची ग्वाही ख़ा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ग्रामस्थांना दिली आहे. दरम्यान खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत निंभोरे व परिसरातील ग्रामस्थांची एकत्र बैठक घेवून या प्रश्‍नाचे गांभीर्य समजावून देवून संबंधीत ग्रामपंचायतींचे ठराव घेतले जाणार असल्याची माहिती अमित रणवरे यांनी दिली आहे.

निंभोरे ता. फलटण येथे शिक्षणासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी परिसरातील गावातून येतात त्याचप्रमाणे मिरगाव, ढवळेवाडी, नांदल, काशिदवाडी, वडजल, भिलकटी, फडतरवाडी, जिंती या परिसरातून अनेक शेतकरी खते, बी-बियाणे, किटकनाशक औषधे वगैरे खरेदीसाठी निंभोरे येथे येत असतात त्याशिवाय परिसरातून पुणे, लोणंद व फलटणकडे जाणार्‍या वाहनांची संख्या मोठी असल्याने भविष्यात होणार्‍या राष्ट्रीय महामार्गामुळे या वाहतूकीत होणारी वाढ लक्षात घेवून स्थानिकांच्या सुरक्षिततेसाठी सदरचा उड्डानपूल आवश्यक असल्याने सदरची मागणी निंभोरे व पंचक्रोशीतील ग्रामस्थांमधुन होत असल्याचे अमित रणवरे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!