नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


दैनिक स्थैर्य । दि. २७ जानेवारी २०२३ । मुंबई । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत झालेल्या सहायक मोटर वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा २०२० मधील शिफारसपात्र २३३ उमेदवारांपैकी प्रातिनिधिक स्वरुपात १३ उमेदवारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देवून रस्ते अपघात व मृत्यू कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी हा नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, अपर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील, माजी खासदार ब्रिगेडियर सुधिर सावंत आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नवनियुक्त अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्ते अपघातात नागरिकांच्या मृत्यू संख्येबाबत चिंता व्यक्त केली. गेल्यावर्षी नाशिक येथील बस अपघाताचे उदाहरण देत राज्यात रस्ते अपघात आणि नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहेत. सर्वाधिक अपघात हे मध्यरात्री किंवा पहाटेच्या  वेळेत होत असल्याचे निदर्शनास येत आहेत. अशा रस्ते अपघातांवर आळा घालण्यासाठी रस्त्यांवरील अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅकस्पॅाट) यावर उपाययोजना कराव्यात. या क्षेत्रामधील रस्त्यांवर जनजागृतीपर वाहतूक सूचना फलके, दिवे, दिशानिर्देशक फलके, अपघात प्रवण क्षेत्र फलक, वेग मर्यादा इ. व्यवस्था करावी. वारंवार अपघात करण्याऱ्या व निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्या चालकांवर कडक कारवाई झाली पाहीजे. रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालवून नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कार्रवाई करण्यासंदर्भात कायद्यातील तरतुदी तपासून योग्य उपाययोजना कराव्यात, अशा सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या.

रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान व संकल्पना राबविल्या पाहिजेत. तसेच नागरीकांमध्ये रस्ते सुरक्षा नियमांसंदर्भात जनजागृती करावी. राज्यातील एकेक नागरीकाचा जीव महत्वाचा आहे. अपघाती मृत्यूंमध्ये तरुण मुलांचा समावेश आहे. त्यामुळे सर्व नागरीकांच्या रस्ते सुरक्षेला प्राधान्य दिले जावे. वाहन चालविण्याचा परवाना देण्याची प्रक्रिया कडक करावी. तसेच वाहन चालकाला परवाना देण्या अगोदर वाहन चालविण्याचे ज्ञान व नियम माहित असले पाहीजे यासाठी कडक नियमांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी दिले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दि. १७ जानेवारी, २०२० रोजी सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परिक्षा २०२० मध्ये २४० पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ही परिक्षा दि. १५ मार्च, २०२० रोजी घेण्यात आली होती. आयोगामार्फत दि. ३० ऑक्टोबर २०२१ रोजी सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परिक्षा-२०२० घेण्यात आली. या मुख्य परीक्षेनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एकूण २४० पैकी २३३ उमेदवारांची शासनास शिफारस करण्यात आली होती. या उमेदवारांपैकी प्रातिनिधिक स्वरुपात १३ उमेदवारांना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते आज नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. उर्वरित उमेदवारांना कागदपत्र पडताळणीअंती पात्र ठरल्यानंतर नियुक्ती आदेश जारी करण्यात येणार आहे.


Back to top button
Don`t copy text!