दैनिक स्थैर्य | दि. १ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
रयत संकुल, लोणंद आयोजित रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील (डी. लिट.) यांचा १३७ वा जयंती समारंभ पार पडला. सुसंस्कृत, सुसंपन्न व गोरगरीबांसाठी शिक्षण देणारी संस्था म्हणजे रयत शिक्षण संस्था, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, इतिहास अभ्यासक व लेखक डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी केले.
लोणंद येथे रयत संकुलाच्यावतीने आयोजित केलेल्या पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
शिवरायांनी रयतेचे राज्य निर्माण केलं आणि याच रयतेला शिक्षण देण्याचे काम डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले, असे सांगून श्रीमंत कोकाटे म्हणाले की, चटके बसल्याशिवाय चांगली भाकर भेटत नाही. शिक्षणानेच परिवर्तन घडते. शिक्षण सक्षम बनते म्हणून जो शिक्षण घेतो तो कधी कोणाचा गुलाम होऊ शकत नाही. शिकाल तर टिकाल नाहीतर भंगारात फेकाल. ज्ञानाची दिवाळी साजरी करा, शिक्षणाची दिवाळी साजरी करा असे त्यांनी सांगितले. सुसंस्कृत सुसंपन्न गोरगरिबांसाठी शिक्षण देणारे संस्था म्हणजे रयत शिक्षण संस्था.
आयुष्यातले खरे हिरो कोणते, याविषयी बोलताना ते म्हणाले की, पोलीस खात्यात अधिकारी पदावर काम करणारे अधिकारी ज्यांनी २६/११ च्या हल्ल्यात मुंबई वाचवली ते आणि सीमेवरती गस्त घालणारे आपले सैनिक हे खरे हिरो असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व माणसे समान आहेत, असा आग्रह आण्णांनी आपल्या आयुष्यात जोपासला.डॉ. कर्मवीर भाऊराव पाटलांनी भूतकाळात अडकलेल्या समाजाला शिक्षणाची दारे खुले करून वर्तमानकाळात आणण्याचे काम केले. ज्याला चेहरा नसतो त्याला चेहरा देण्याचे काम शिक्षण करत असते. त्यामुळे डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबरोबरच आपली शाळा व शिक्षकांचा विसर पडता कामा नये, असे ते म्हणाले.
कमी मार्क्स पडले तर निराश होऊ नका, जास्त मार्क पडण्याचा प्रयत्न करा. गुणवत्ता कोणाची मक्तेदारी नाही. खरी गुणवत्ता खेड्यापाड्यात असते, चांगलं रोपटं नेहमी मातीत उगवते. सिमेंटच्या जंगलात कधीच उगवत नाही. सुपर कॉम्प्युटर तयार करणारे विजय भटकर खेडेगावातील व्यक्ती होता. खेड्यातील शेतकर्यांचा मुलगा त्याने सुपर कम्प्युटरचा शोध लावला. स्वतला कमी लेखू नका, संकटाला संधी समजा, संकट नेहमी संधी सोबत घेऊन येते. आजची लढाई ज्ञानाची आहे, विचारांची आहे. जीवनात आपण सकारात्मक असले पाहिजे. अण्णांच्या आयुष्यात भरपूर संकटे आली, पण अण्णा कधी हताश झाले नाहीत, ते जिद्दीने संकटाला सामोरे गेले व रयत शिक्षण संस्था तेवत ठेवली. जगात अशक्य काही नाही, तुम्ही गरीबाचे श्रीमंत होऊ शकता, तुम्ही अज्ञानी असाल ज्ञानी होऊ शकता, हे सर्व कर्मवीरअण्णांनी करून दाखविले.
रयतेच्या शाळेत फक्त ज्ञान दिले जात नाही तर स्वावलंबी माणूस घडवला जातो. रयतेच्या या मंदिरातून जो शिक्षण घेऊन बाहेर पडतो, तो निश्चितच भारताचा चांगला नागरिक होतो, असे प्रतिपादन मालोजीराजे विद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले रवींद्र डोईफोडे यांनी केले. अण्णांच्या विचारांचा त्यांच्यावर कसा प्रभाव पडला व ते कसे घडत गेले, याविषयी त्यांनी सांगितले.
जनरल बॉडी सदस्य र.शि.स.सातारा व आजीव सदस्य, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मिलिंद माने यांनी कर्मवीरांच्या विचारांचा वारसा पुढे न्यावा, असे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषण करताना मा. प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे म्हणाले की, शेकडो वर्ष अज्ञानाच्या अंधारात झटपटणारा जो समाज होता अशा या समाजास ज्ञानाचा प्रकाश देण्याचे काम कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले. आभार प्राचार्या सुनंदा नेवासे यांनी मानले. सूत्रसंचालन नायकू एम. डी. व सौ. मोरे आर. व्ही. यांनी केले.
यावेळी जनरल बॉडी सदस्य र. शि. स. सातारा व आजीव सदस्य, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मिलिंद माने, माजी सभापती, समाज कल्याण जि. प. सातारा आनंदराव शेळके-पाटील, केंद्र प्रमुख साळुंखे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ. अनिलराजे निंबाळकर, सुनील शहा, माजी नगरसेविका दिपाली शेळके, शरदचंद्र पवार महाविद्यालय, लोणंदचे प्र. प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, बागवान, निकाळजे, प्राचार्या सौ. सुनंदा नेवसे, प्राचार्य चंद्रकांत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
मालोजीराजे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, लोणंदचे प्राचार्य तथा रयत शिक्षण संस्थेचे समन्वय समिती सदस्य चंद्रकांत जाधव यांनी प्रास्ताविक केले.
प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे सहसचिव(उ.शि.) रयत शिक्षण संस्था, सातारा हे कार्याक्रमाचे अध्यक्ष होते. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून अॅड. सुरेंद्र बोडरे, निबंधक, भागीदारी संस्था (से.नि.) यांची होती. प्राचार्य चंद्रकांत जाधव यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. तसेच सर्व मान्यवराचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.