रयत शिक्षण संस्था म्हणजे मूल्यशिक्षणाचे संस्कारपीठ – डॉ. अशोक शिंदे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २७ सप्टेंबर २०२२ । फलटण । कमवा व शिका या उपक्रमाबरोवर कर्मवीर विद्याप्रबोधिनी, गुरुकुल व विविध स्पर्धा परीक्षा अशा अनेकविध उपक्रमांच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीबरोबरच स्वावलंबन, श्रमप्रतिष्ठा, समता, बंधुता, सहिष्णुता या मूल्यांची जोपासना करणारी रयत शिक्षण संस्था ही आजच्या काळातील आदर्श संस्कारपीठ आहे असे प्रतिपादन मुधोजी महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्राध्यापक डॉ. अशोक शिंदे यांनी केले.

कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालय बिजवडी आयोजित पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 135 व्या जयंती कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे नवनियुक्त जनरल बॉडी सदस्य हनुमंत जगन्नाथ भोसले होते.

याप्रसंगी विठ्ठलराव भोसले, दौलतराव जाधव, अप्पा अडागळे, योगेश भोसले, प्रतिक भोसले व मुख्याध्यापक बी. के. सावंत व उपस्थित होते.

यावेळी प्राध्यापक शिंदे म्हणाले, कर्मवीरांनी अत्यंत परिश्रम व विचारपूर्वक रयतेची स्थापना केलेली आहे. शिक्षणाच्या माध्यमातून सर्व सामान्य बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाच्या मूलभूत संकल्पनेचा अंगीकार केलेला आहे. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, नंतर प्रशिक्षित शिक्षक निर्माण व्हावेत म्हणून ट्रेनिंग कॉलेज व नंतर शाळा – कॉलेजची निर्मिती असे शिक्षणप्रक्रियेचे सूत्रबद्ध व सुनियोजित प्रारूप त्यांनी विकसीत केले. या माध्यमातून बहुजन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या मूलभूत अडचणी दूर होऊन तो शिक्षणाच्या मूळ प्रवाहात सामील झालेला आहे. यामुळे लक्षावधी विद्यार्थ्यांचे आयुष्य रयतेमुळे समृद्ध झालेले आहे.
विद्यार्थ्यांनी या विविध उपक्रमामध्ये सहभागी होऊन आपले व्यक्तिमत्व घडवावे व कर्मवीर आण्णांचे विचार सार्थक करावेत असे आवाहनही डॉ. शिंदे यांनी यावेळी केले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना हनुमंत भोसले यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून राबवत असलेल्या उपक्रमासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी दौलत जाधव, प्रतिक भोसले यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचा प्रारंभ स्वागतगीताने झाला. मुख्याध्यापक सावंत यांनी प्रास्ताविक, बिडवे यांनी अहवाल वाचन केले. पवार यांनी परिचय करून दिला.

यवेळी गुणवंत व विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय गावडे यांनी केले. निंबाळकर यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!