सोनवडी ग्रामपंचायतीच्या तक्रारीची दखल; देशी दारूचा साठा जप्त


स्थैर्य, फलटण, दि. ३१ ऑगस्ट : सोनवडी ग्रामपंचायतीने केलेल्या तक्रारीची तातडीने दखल घेत, फलटण ग्रामीण पोलिसांनी सोनगाव येथे सुरू असलेल्या अवैध देशी दारू विक्रीवर छापे टाकून दोघांवर कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी देशी दारूचा साठा जप्त केला असून, दोन्ही आरोपींविरुद्ध मुंबई दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनगाव येथे अवैध दारू विक्री सुरू असल्याची तक्रार सोनवडी ग्रामपंचायतीने पोलिसांना निवेदनाद्वारे दिली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने, पोलीस निरीक्षक श्री. सुनील महाडीक यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार सहाय्यक पोलीस फौजदार श्री. राजेंद्र माने, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल वैभवी भोसले, महिला पोलीस कॉन्स्टेबल अरुंधती करणे व गौरी सावंत यांच्या पथकाने दि. २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी सोनगाव येथे छापे टाकले.

पहिल्या कारवाईत, सायंकाळी ६.२० वाजता सचिन शामराव कांबळे हा त्याच्या घराच्या आडोशाला देशी दारूची विक्री करत असताना आढळून आला. त्याच्याकडून पोलिसांनी ३५ देशी दारूच्या बाटल्या (किंमत १,४०० रुपये) जप्त केल्या. दुसऱ्या कारवाईत, सायंकाळी ७.३० वाजता आदित्य संजय बनसोडे हा त्याच्या घराच्या भिंतीच्या आडोशाला दारू विकताना सापडला. त्याच्याकडून पोलिसांनी २० देशी दारूच्या बाटल्या (किंमत ८०० रुपये) जप्त केल्या.

ग्रामपंचायतीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.


Back to top button
Don`t copy text!