स्थैर्य, नवी दिल्ली, दि.२९: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार पुन्हा एकदा दोन हजार रुपयांचा पुढील हप्ता शेतक-यांच्या खात्यावर पाठवणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत सातवा हप्ता येत्या १ डिसेंबरपासून शेतक-यांच्या खात्यावर जमा होईल.
या योजनेंतर्गत वर्षाला तीन हप्त्यांमध्ये शेतक-यांना सहा हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत शेतक-यांना सहा हप्ते शेतक-यांना पाठविण्यात आले आहेत.
गेल्या २३ महिन्यांत केंद्र सरकारने ११.१७ कोटी शेतक-यांना ९५ कोटी रुपयांहून अधिक मदत दिली आहे. पीएम किसान सन्मान योजनेत केंद्र सरकार हे पैसे तीन हप्त्यांमध्ये शेतक-यांच्या खात्यावर जमा करते. पहिला हप्ता १ डिसेंबर ते ३१ मार्चदरम्यान करण्यात येतो, तर दुसरा हप्ता १ एप्रिल ते ३१ जुलै दरम्यान आणि तिसरा हप्ता १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर दरम्यान शेतक-यांच्या खात्यात जमा केला जातो.
कागदपत्रे बरोबर असतील तर सर्व ११.१७ कोटी नोंदणीकृत शेतक-यांना सातव्या हप्त्याचा लाभ देखील मिळेल. यासाठी शेतक-यांनी आपली नोंद तपासावी. जेणेकरून पैसे मिळण्यास कोणतीही अडचण उद्भवणार नाही.
नोंदणीमध्ये काही गडबड असल्यास तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. कृषी मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, १.३ कोटी शेतक-यांना अर्ज करूनही पैसे मिळाले नाहीत. कारण, एकतर त्यांची नोंद चुकीची आहे किंवा आधारकार्ड नाही. तसेच, स्पेलिंगमध्ये (शब्दलेखन) गडबड झाली तरी सुद्धा पैसे थांबविले जाऊ शकतात.
योजनेंतर्गत आपण घरी ऑनलाईन अर्ज (नोंदणी) करू शकता. यासाठी शेतक-यांना अर्ज करण्यासाठी किंवा त्यामध्ये काही बदल करण्यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाइटवरून करता येणार आहे.
यासाठी प्रथम ‘पीएमकिसान डॉट गव्ह डॉट इन’ या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. वेबसाइटच्या पहिल्या पानावर, फार्मर्स कॉर्नर उजव्या बाजूला मोठ्या अक्षरे लिहिलेले आहे. आपले नाव सूचीमध्ये आहे की नाही हे आपण पाहू इच्छित असल्यास आपल्याला लाभार्थी यादी / बेनीफिशिअरी लिस्ट वर क्लिक करावे लागेल. यानंतर आपण आपले नाव राज्य, जिल्हा, उपजिल्हा, गट आणि गाव यांचे नाव भरून तपासू शकता.
अधिक माहितीसाठी आपल्या कृषी विस्तार अधिका-यांशी संपर्क करा आणि आपली सर्व माहिती अद्ययावत करुन घ्या.