दैनिक स्थैर्य | दि. १२ ऑक्टोबर २०२३ | बारामती |
यंदा सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त बारामती रोटरी क्लबने मास्टर-शेफ सीझन पहिला व गौरी – गणपती सजावट या स्पर्धांचे आयोजन केले होते.
गौरी- गणपतीची सजावट स्पर्धा ही ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. यामध्ये जागतिक तापमान वाढ व सामाजिक जाणीव या दोन विषयावर स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये पहिले बक्षीस सौ. वर्षा रवींद्र थोरात यांनी पटकवले. त्यांना सराफ होंडा यांचेतर्फे ५००१ रूपयांचे व्हाउचर देण्यात आले. तसेच द्वितीय क्रमांक सौ. प्रियांका नितीन काटे व तृतीय क्रमांक चेतन गायकवाड यांना देण्यात आले. त्यांना सराफ होंडा यांचेकडून अनुक्रमे ३००१ व २००१ रुपयांचे व्हाउचर देण्यात आले.
या कार्यक्रमाचे परिक्षण महेंद्र दीक्षित, रुपाली तावरे आणि वृशाली देशपांडे यांनी केले.
या स्पर्धेत प्रसिद्ध इटीव्ही सेलिब्रिटी शेफ पूर्वा मेहता यांनी प्रतिष्ठित परीक्षक म्हणून काम पाहिले.
या उल्लेखनीय स्पर्धेत रोटरी क्लबच्या वतीने आवश्यक असणारी भांडी, किराणा सामान, गॅस शेगडी, सिलिंडर व इतर सर्व आवश्यक साहित्य प्रदान केले. प्रत्येक गटाला दोन स्वादिष्ट पदार्थ तयार करण्याची ही मास्टर शेफ स्पर्धा होती. या चुरशीच्या स्पर्धेमध्ये सर्वच स्पर्धकांनी वेगवेगळ्या रुचकर डिशेस अवघ्या २ तासात तयार केल्या. या कार्यक्रमात महिलांसोबत विशेषतः पुरूषांनीदेखील सहभाग घेतला होता.
शेफ पूर्वा मेहता यांनी परीक्षण करून प्रथम पारितोषिक स्नेहल केचे आणि अक्षता मखर यांना दिले. व्ही. आर. इलेक्ट्रॉनिक्सतर्फे दोघींना एक एक सिंफनी कंपनीचा एयर कुलर आणि दिया सिल्क यांचेतर्फे सिल्कची साडी बक्षीस म्हणून देण्यात आली. दुसरे पारितोषिक पूजा मांडरे आणि स्वाती सूर्यवंशी यांनी पटकाविले. त्यांना सिंगर मिक्सर देण्यात आला व तिसरे पारितोषिक तृप्ती कोकरे, वैशाली काळे, निखिल नवलखा आणि गौरी नवलखा यांच्यात विभागून देण्यात आले. त्यांना प्रत्येकी एक टेबल फॅन व्ही. आर. इलेक्ट्रॉनिक्सतर्फे देण्यात आला.
रोटरी क्लब ऑफ बारामतीच्या अध्यक्षा दर्शना गुजर, सचिव अभिजीत बर्गे व सर्व रोटेरियन्स यावेळी उपस्थित होते.